Devendra Fadnavis Delhi cabinet move Claim: देवेंद्र फडणवीस यांना लवकरच दिल्लीत बोलवले जाईल आणि मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाईल, असा दावा गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाकडून गेला जात आहे. आदित्य ठाकरेंनी फडणवीसांचे मुख्यमंत्री म्हणून हे अखेरचे अधिवेशन असल्याचे विधान वारंवार केले आहे. फडणवीस दिल्लीत गेल्यास राज्याची सूत्रे कोणाकडे येतील? असा प्रश्न विचारला असता खासदार संजय राऊतांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव घेतले. राऊतांनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, असेही वक्तव्य केले.
आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?
देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून हे अखेरचे अधिवेशन असेल, यानंतर त्यांना दिल्लीत मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाईल, असे वक्तव्य आमदार आदित्य ठाकरे गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. भाजपा फडणवीसांना महाराष्ट्रात काही केल्या ठेवणार नाही, शिवराज सिंह चौहान यांच्याबरोबर झाला तोच न्याय फडणवीस यांच्याबरोबर होईल, असे आदित्य म्हणत आहेत. पावसाळी अधिवेशन सुरु असताना अनेकदा आदित्य यांनी याचा पुनरुच्चार केला. पण, फडणवीस दिल्लीत गेल्यास राज्याची सूत्रे कोणाकडे येतील याचे उत्तर आज संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना दिले.
…तर बानकुळे मुख्यमंत्री होतील – राऊत
“फडणवीस केंद्रात गेल्यास राज्याची सूत्रे चंद्रशेखर बावनकुळेंकडे येतील, तुम्हाला वाटेल मी आणखी कोणाचे नाव घेईन, पण मला जे चित्र दिसतंय, फडणीसांनंतर विदर्भातील नेते बावनकुळे मला योग्य नेते दिसतात. सर्वांशी संवाद ठेवणारे, सर्वांना सांभाळून घेणारे आहेत. एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाहीत, अजिबात होणार नाहीत. गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे”, असे राऊत म्हणाले. बावनकुळेंची शिफारस देखील स्वत: फडणवीसच करतील असा दावा करताना, फडणवीसांनी २०२९ आधीच पंतप्रधान व्हावे असेही राऊत म्हणाले.
राऊतांनी फडणवीसांना दिल्या शुभेच्छा
“सातत्याने फडणवीस केंद्रात जाणार या चर्चा सुरु आहेत. आता केंद्रात जाणार म्हणजे काय करणार? २०२९ पूर्वी पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंद होईल, मराठी माणूस म्हणून आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. उद्धव ठाकरेंनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कारण, २०२९ नंतर भाजपाचे राज्य इथं येणार नाही. २०२९ पूर्वी फडणवीस यांना ज्या काही हालचाली करायच्या आहेत त्या कराव्यात”, असे राऊत म्हणाले. राऊतांनी पुढे बोलताना मी तुम्हाला माझा अंदाज, आकलन सांगितलं. त्यांच्या पक्षातले निर्णय आम्ही घेत नाही, पण असं घडू शकेल किंवा असं घडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.
