Devendra Fadnavis Delhi Politics Girish Kuber Analysis BJP Succession: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याच्या आणि संभाव्य राष्ट्रीय भूमिकेच्या चर्चांवर लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी विश्लेषण केले आहे. भाजपात सध्या कर्तृत्ववान नेत्यांची वानवा असल्याने फडणवीस यांच्यासारख्या अर्थव्यवहाराची जाण आणि विकासवादी दृष्टीकोन असलेल्या नेत्याची दिल्लीला गरज आहे, असे कुबेर म्हणाले. तसेच फडणवीस दिल्लीत आल्यास कोणाकोणाची डोकेदुखी वाढू शकते आणि ते अमित शाह यांच्यासाठी आव्हान ठरतील का, यावरही त्यांनी ‘दृष्टिकोन’मधून सविस्तर भाष्य केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत गिरीश कुबेर म्हणाले की, “फडणवीस नावाची दिल्लीशी चर्चा नेहमी होते याचं कारण भाजपामध्ये आता कर्तुत्ववान नेत्यांची वानवा आहे. त्यात फडणवीस म्हणजे उद्योगाला सोयीचा आहे, अर्थव्यवहार कळतो, इंग्रजीमध्ये संवाद साधू शकतो विकासाची एक भाषा आहे आणि नवीन आव्हानांची जाण आहे”, असे मत कुबेर यांनी नोंदवले.
“या तुलनेत राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचे नाव सांगता येणार नाही मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच सांगता येणार नाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राजकीय ताकदीसाठी ओळखले जातील बिहारचे तर ताजे ताजेत आहेत सम्राट चौधरी त्याच्यामुळे अशा वेळेला देवेंद्र फडणवीस त्यांच्यासाठी त्या पक्षाच्या एकंदर देशव्यापी ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्यासाठी महत्त्वाचे आहेत म्हणून त्यांचं नाव वारंवार घेतलं जातं”, असेही कुबेर पुढे म्हणाले. “देवेंद्र फडणवीसांचा स्वतःचा एक अवाका आहे आणि मुख्य म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाची गरज दिल्लीश्वरांना नेहमी वाटत आलेली आहे”, असे कुबेर म्हणाले.
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले त्यांनी मोदींची भेट घेतली आणि त्यांनी येऊन सांगितलं की मला महाराष्ट्राची जबाबदारी दिलेली आहे. या फडणवीसांच्या वक्तव्यावर बोलताना कुबेर म्हणाले की, “हे नाकारणार कोण, जबाबदारी दिलेली आहे, दिलेलीच आहे म्हणून तर तुम्ही मुख्यमंत्री आहात प्रश्न आजचा नाही उद्याचा आहे. राजकीय विधानांविषयी जोपर्यंत एखाद विधान नाकारल जात नाही तोपर्यंत त्याच्यावरती विश्वास ठेवू नका असं म्हटलं जातं. काही गोष्टी अस्पष्ट ठेवण्यामध्येच राजकीय हितसंबंध असतात, हा मुद्दा तसा आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत येतील का? मग दिल्लीत आल्यानंतर ते कोणा कोणाच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या घंटा वाजू शकतील? कोणा कोणाला आव्हान निर्माण होऊ शकेल? कोणाला राज्यात आनंद होईल? कोण त्या मुख्यमंत्री पदासाठी जास्त उत्सुक आहे? त्याच्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट न करण्यामध्येच राजकीय राजकीय स्पष्टता असते हा मुद्दा तसा आहे”, असे विश्लेषण कुबेर यांनी केले.
फडणविसांना महाराष्ट्रात राहणं त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल का दिल्लीत जाणं उपयुक्त ठरेल? यावर बोलताना, “राष्ट्रीय स्तरावर काम करायचं असेल तर दिल्लीत यावं लागेल दिल्ली गाजून दाखवावे लागेल हे विधान तत्वता खरं नाही”, असे कुबेर म्हणाले. “ज्योती बसू आयुष्यभर कधी पश्चिम बंगाल सोडून गेले नाहीत पण तरी सुद्धा सुद्धा ते राष्ट्रीय नेते गणले जात होते. शरद पवारांच्या बाबतीमध्ये तो मुद्दा पवार अर्थातच नंतर दिल्लीमध्ये केंद्रामध्ये मंत्री झाले पण राज्यस्तरावर तुमची जर जबरदस्त हुकमत असेल तरी सुद्धा तुम्ही देशपातळीवरती तितकेच महत्त्वाचे नेते ठरू शकताच”, असे कुबेर म्हणाले.
“फडणवीस दिल्लीत जाण्याचा निर्णय हा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ निवडून येतात का याच्याशी जोडला जाईल. स्वबळावर त्यांनी सत्ता आणली तर अर्थातच ते क्रमांक एकच्या पदाचे आव्हानवीर मानले जातील. पण, त्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत नेलं गेलं तर त्यांना क्रमांक एकचा उत्तराधिकारी म्हणून नेलं जातय का हे बघणं महत्त्वाचं ठरेल आणि तसं असेल तर अर्थातच आत्ता जे उत्तराधिकारी गणले जातात त्यांना ते साहजिकच अमान्य होईल”, असे कुबेर म्हणाले. हा गुंता स्वतःहून भाजप निर्माण करेल अशी शक्यता नाही तसेच, फडणवीस अमित शाहांसाठी चॅलेंज ठरणार नाहीत, असे मत कुबेरांनी व्यक्त केले.
