गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या राजकारणात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यावरून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना आज शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
‘देवेंद्र फडणवीस केंद्रात गेल्यास राज्याची सूत्रे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे येतील’, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या घडामोडींवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच भाष्य करत मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली?
तुम्ही दिल्लीला जाणार, अशा चर्चा आहेत. तुम्ही देशाचं नेतृत्व करावं अशाही चर्चा आहेत. यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “मी परवाच दिल्लीला जाऊन आलो.”
संजय राऊत काय म्हणाले होते?
“मुख्यमंत्री फडणवीस केंद्रात गेल्यास राज्याची सूत्रे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे येतील. तुम्हाला वाटेल मी आणखी कोणाचं नाव घेईन, पण मला जे चित्र दिसतंय, फडणवीसांनंतर विदर्भातील नेते बावनकुळे मला योग्य नेते दिसतात. सर्वांशी संवाद ठेवणारे, सर्वांना सांभाळून घेणारे आहेत. एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाहीत, अजिबात होणार नाहीत. गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे. बावनकुळेंची शिफारस देखील स्वत: फडणवीसच करतील आणि फडणवीसांनी २०२९ आधीच पंतप्रधान व्हावं”, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
संजय राऊतांनी फडणवीसांना दिल्या शुभेच्छा
“सातत्याने देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार या चर्चा सुरु आहेत. आता केंद्रात जाणार म्हणजे काय करणार? २०२९ पूर्वी पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंद होईल, मराठी माणूस म्हणून आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. उद्धव ठाकरेंनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कारण, २०२९ नंतर भाजपाचे राज्य इथं येणार नाही. २०२९ पूर्वी फडणवीस यांना ज्या काही हालचाली करायच्या आहेत त्या कराव्यात. मी तुम्हाला माझा अंदाज, आकलन सांगितलं. त्यांच्या पक्षातले निर्णय आम्ही घेत नाही, पण असं घडू शकेल किंवा असं घडण्याची शक्यता आहे”, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?
“देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून हे अखेरचे अधिवेशन असेल, यानंतर त्यांना दिल्लीत मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाईल”, असं वक्तव्य आमदार आदित्य ठाकरे केलं होतं. फडणवीसांना भाजपा महाराष्ट्रात काही केल्या ठेवणार नाही, शिवराज सिंह चौहान यांच्याबरोबर जो न्याय झाला, तोच न्याय फडणवीस यांच्याबरोबर होईल”, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं.
