मागील जवळपास दहा दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेला सत्तासंघर्षाचा शेवट नाट्यमयरित्या झाला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले, तर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी होण्यापूर्वी काही तास आधीपर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असं सर्वांना वाटत होतं. मात्र ऐनवेळी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदासाठी वर्णी लागली. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असं असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील अंतर्गत कलहामुळे फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत विचारलं असता भाजपाचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “आमच्यात अत्यंत सलोख्याची नाती आहेत. पक्षासाठी मान कापून देण्याची तयारी आमच्यात असते. ज्यांना हे जमत नाही, ज्यांना याचा हेवा वाटतो, अशा लोकांनी तयार केलेली ही कथा आहे.”

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, “देशात सध्या दोन विचारधारा आहे. यामध्ये हिंदुत्ववादी विचारधारा एक आहे. हिंदुत्वाचे विचार मान्य असणाऱ्या अनेकांनी त्या-त्या वेळी भाजपासोबत युती केली. २०१९ पर्यंत ही युती कायम होती. पण त्यानंतर हिंदुत्व मागे पडलं आणि खुर्ची पुढे आली. विश्वासघात झाला.”

“जे कधी हिंदुत्व मानत नाही, त्यांचा कधी हिंदुत्वाचा एजेंडा देखील नव्हता, त्यांच्या मांडीला मांडी लावून हे बसले. सुरुवातीला त्यांनी महाशिवआघाडी नाव ठेवलं होतं. त्याचं महाविकास आघाडी कधी झालं कळलं देखील नाही,” अशा शब्दांत चंद्रकांत पाटलांनी टीका केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis denied chief minister post due to quarrel with amit shah chandrakant patil gave answer rmm
First published on: 01-07-2022 at 17:03 IST