Devendra Fadnavis reaction on Dhirendra Shastri Bageshwar Baba remarks sparks political row in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. यावेळी फडणवीसांनी धीरेंद्र शास्त्री यांचा उल्लेख ‘साधू-संत’ असा केला होता. यावरून आता विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे. संत परंपरेशी ढोंगी बाबाला जोडताना देवेंद्र फडणवीसांना लाज वाटली पाहिजे असे सपकाळ एक्सवर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. इतकेच नाही तर सपकाळ यांनी धीरेंद्र शास्त्री यांचा उल्लेख विकृत असा केला आहे.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “विकृत धीरेंद्र शास्त्रीने (बागेश्वर बाबा) छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गरळ ओकली आणि तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच विकृताचा उल्लेख ‘साधू-संत’ असा केला. हा महाराष्ट्राच्या महान संत परंपरेचा अपमानच आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराजांपासून ते आधुनिक काळातील गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या वाणी आणि लेखणीने समृद्ध केलेल्या संत परंपरेशी या ढोंगी बागेश्वर बाबाला जोडताना देवेंद्र फडणवीसांना लाज वाटली पाहिजे. त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे.”

मुख्यमंत्र्यांनी रोखायला हवं होतं – संजय राऊत

शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी देखील मुख्यमंत्र्‍यांनी धीरेंद्र शास्त्री यांना असे वक्तव्य करण्यापासून रोखायला हवे होते असे मत व्यक्त केले आहे. राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “अशा बुवा आणि महाराजांना आणून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड करण्याचं कारण काय? हे बुवा जेव्हा छत्रपती शिवरायांच्या इतिहासावरती बोलत होते तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवायला हवं होतं किंवा सरसंघचालकांनी त्यांना रोखायला हवं होतं. त्यांना महाराष्ट्राच्या भावना, इतिहास याबाबत जाणीव करून द्यायला हवी होती.”

“भोंदूला काही नेते संत म्हणत असतील तर..”, रोहित पवारांची पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी देखील धीरेंद्र शास्त्री यांच्यावर एक्सवर पोस्ट करत टीका केली आहे. रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, “चार मुलं जन्माला घालून एक मुल संघाला द्या”, हे भोंदू बागेश्वर बाबाचं वाक्य मनुवादी पुरुषी मानसिकतेचंच लक्षण आहे. या मानसिकतेने मनुस्मृतीच्या माध्यमातून महिलांना क्रोधी, दुष्ट आणि विश्वासघातकी म्हणून हिणवलं असून महिलांना कायम दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न केला आणि यांच्या विचारसरणीतही महिलांना कोणतंही स्थान नाही, हेच स्पष्ट केलं. यासाठीच तर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं.

“महिलांना केवळ मुलं जन्माला घालण्याचं मशीन समजून त्यांना चूल आणि मुलापुरतंच मर्यादीत करु पाहणारा हा भोंदू बागेश्वर बाबा एकप्रकारे मनुस्मृतीचंच आधुनिक व्हर्जन आहे. राजकीय व्यासपीठावर हा भोंदू असली वक्तव्ये करत असेल तर हेच का यांचं नारीशक्ती वंदन? या भोंदूला एवढीच काळजी आहे तर त्याने मुलं जन्माला घालण्याची सुरवात स्वतःपासून करावी आणि भाजपा नेत्यांसाठीही हाच सल्ला अनिवार्य करावा. या भोंदूला काही नेते संत म्हणत असतील तर महाराष्ट्राचं याहून मोठं वैचारिक अधःपतन ते कोणतं!” असेही रोहित पवार म्हणाले.

महाराष्ट्र योग्य वेळी उत्तर देणार! – वडेट्टीवार

“छत्रपतींचा अवमान महाराष्ट्र सहन करणार नाही ! कवडीचे अक्कल नसलेला कोणीतरी भोंदू महाराष्ट्रात येतो आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो ही बाब अत्यंत दुर्दैवी व लाजिरवाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वतःचा कर्मावर विश्वास होता. महाराज कधीच कोणत्या भोंदू बाबासमोर झुकले नाहीत. महाराज झुकले नाहीत म्हणून हे स्वराज्य स्वाभिमानाने उभे राहिले. अशा आमच्या स्वाभिमानी दैवताचा अपमान करण्याची हिम्मत कोणी भोंदू करत असेल, ही भोंदूगिरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निमूटपणे सहन करत असतील, तर महाराष्ट्र हे सहन करणार नाही. महाराष्ट्र योग्य वेळी उत्तर देणार!” असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

धीरेंद्र शास्त्री छत्रपती शिवाजी महाराजांबाबत काय म्हणाले होते?

बागश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांच्याबाबत एक विधान केले होते. या विधानावरून सध्या राजकीय वाद पेटला आहे. “एकदा युद्ध करून थकलेले शिवाजी महाराज रामदास स्वामींकडे गेले आणि म्हणाले आता मला विश्रांती घ्यायची आहे, राज्याचा कारभार तुम्ही सांभाळा म्हणत डोक्यावरचा जिरेटोप रामदास स्वामींना दिला. त्यावर रामदास स्वामी म्हणाले मी गुरू आणि तुम्ही माझे शिष्य आहात. शिष्याचं कर्तव्य म्हणजे गुरुच्या आज्ञेचं पालन करणं. त्यामुळे मी राज्यकारभार स्वत:कडे घेऊन तुम्हाला आज्ञा देतो की तुम्ही माझ्या वतीने तो सांभाळावा”, असा प्रसंग बागेश्वर शास्त्रींनी सांगितला. त्यावरून राजकीय, सामाजिक वर्तुळातून दावे-प्रतिदावे होऊ लागले आहेत.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

दरम्यान धीरेंद्र शास्त्री यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना इतिहासात अशा प्रकारचा कुठलाही दाखला पाहायला मिळत नसल्याचे नमूद केले. महापुरुषांविषयी अनेक लोककथा तयार होतात. वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या लोककथा असतात. रामायण, महाभारताशी संबंधित अनेक लोककथा आहेत. आपण जो इतिहास शिकलो त्यात आणि उपलब्ध ग्रंथांत असा कुठलाही दाखला नाही, असे फडणवीस यांनी नमूद केले.

​पुढे बोलताना फडणवीस यांनी, धीरेंद्र शास्त्री यांच्या चार मुले जन्माला घाला, त्यातील एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या या आवाहनावर देखील भाष्य केले. याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधू-संत त्यांची मते मांडतात, त्यांचा उद्देश योग्य संदर्भाने घेतला पाहिजे,असे सांगितले. त्यांच्या म्हणण्याचा उद्देश राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशी संघटना आहे की जिने हिंदू संस्कृती, सनातन संस्कृतीला जिवंत ठेवले, नवचैतन्य दिले आहे. त्यामुळे आपल्या घरचा एक मुलगा संघात असावा, असे त्यांचे म्हणणे असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.