मुंबई : विधान परिषदेच्या विशेष अधिकार समितीने सूर्यकांत मोरे (रत्नापूर, ता. जामखेड) यांना प्रस्तावित केलेली ३० दिवसांच्या कारावासाची शिक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमी करून सात दिवसांची केली. अमोल मिटकरी यांच्या हक्कभंग आणि अवमान प्रकरणात संबंधितांनी माफी मागितल्यामुळे त्यांची प्रस्तावित शिक्षा रद्द करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
श्रीकांत भारतीय आणि प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेचे सभापती आणि आजी, माजी सदस्यांचा अवमान केल्याप्रकरणी विशेष अधिकार समितीकडे तक्रार केली होती. संबंधित प्रकरणाची चौकशी करून हक्कभंग समितीने ३० दिवसांच्या दिवाणी कारावासाची अत्यंत कडक शिक्षा प्रस्तावित केली होती. शिक्षा प्रस्तावित केल्यानंतर संबंधितांनी माफी मागितली नाही. त्यांचा व्यवहार, वागणे पाहिल्यानंतर शिक्षा योग्यच होती, असे दिसते.
पण, सभापतींशी चर्चा केली. शिक्षा करणे हा सभागृहाचा उद्देश नाही. सभागृहाचा सन्मान राखला जाणे हाच एकमेव उद्देश आहे. त्यामुळे ३० दिवसांच्या कारावासाची शिक्षा सात दिवस केली आहे. पण, वारंवार असे वर्तन करणाऱ्यांना सभागृह यापेक्षा कडक शिक्षा करू शकते, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.
माफीनंतर यूट्यूब वाहिनीच्या संपादकांना दिलासा
सत्य लढा या स्थानिक यूट्यूब वाहिनीचे संपादक आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर विशेष अधिकार भंग आणि अवमान प्रकरणी अमोल मिटकरी यांनी १८ जुलै २०२३ रोजी विशेष अधिकार भंग समितीकडे तक्रार केली होती. संबंधित संपादक सतिष देशमुख, गणेश सोनवणे, हर्षदा सोनवणे, अमोल नांदूरकर, अंकुश गावंडे यांना समितीने पाच दिवसांच्या दिवाणी कारावासाची शिक्षा प्रस्तावित केली होती.
पण, संबंधितांनी माफी मागितली आहे. माफीनाम्याची चित्रफित समितीला सादर केली आहे तसेच पुन्हा असे कृत्य होणार नाही, असे लेखी दिल्यामुळे आणि मिटकरी यांनीही त्यांना माफ केल्यामुळे त्यांची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले.
