मुंबई : राज्यातील अनेक प्रकल्प २५ वर्षांपासून प्रलंबित होते. केंद्र सरकारच्या परवानग्या हा कळीचा मुद्दा होता. पण आपण यातील प्रकल्प प्रगती आढाव्यात घतले आणि ते सर्व मार्गी लागले. त्यामुळेच २०१४ नंतर भूमीपूजन ते लोकार्पणाचा टप्पा आपल्या नेतृत्वात साध्य झाला, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्र स्थापना दिनी पंतप्रधान मोदी यांनी फडणवीस यांना शुभेच्छा पत्र पाठवत राज्यातील वेगवान आर्थिक विकासासंदर्भात कौतुक केले होते. मोदी यांचे आभार व्यक्त करण्यासाठी फडणवीस यांनी उलटपत्र पाठवले आहे.
राज्यातील प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या पाठिशी आपण अतिशय ठामपणे असता. कोणत्याही प्रकल्पाच्या परवनाग्या तातडीने देण्याबाबात आपण निर्दंश दिले. अटलसेतू, किनारी मार्ग, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई मेट्रो ३, नागपूर आणि पुणे मेट्रो, समृद्धी महामार्ग या प्रकल्पांचे लोकार्पण आपल्यामुळे शक्य झाले, असे फडणवीस यांनी पत्रात लिहिले आहे.
राज्यातील वाढवण बंदर आकर्षण ठरणार आहे. हे जगातील दहा बंदरापैकी एक असेल. पुढची ५० वर्षे हे बंदर देश व राज्याच्या आर्थिक विकासाचे संचलन करणार आहे. तिसऱ्या व चौथ्या मुंबईच्या निर्मितीकडे राज्याचा प्रवास सुरु आहे. विदा केंद्रे, परदेशी विद्यापीठाचे जाळे, ग्रोथ हब हे सारे येथे उभे राहात आहे. संभाजीनगर येथे ऑरिक सिटी, दिघी पोर्ट, अमरावती येथे प्रधानमंत्री टेक्सटाईल पार्क हे सारे आपल्या पाठिंब्यामुळे करु शकलाे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
गडचिरोलीला माओवाद्यापासून मुक्त करु शकलो. गडचिरोली आता पोलादाचे शहर म्हणून उदयास येत आहे. चीनपेक्षा स्वस्त लोखंड आम्ही येथे उत्पादीत करणार आहोत, हे सर्व आपल्या दृढनिश्चयामुळे शक्य झाले. वेव्ह परिषदेच्या आयोजनाचा मान महाराष्ट्राला दिला. आयआयटीच्या धर्तीवर आयआयसीटी मंजूर केली. आयआयएम, एम्स दिले. राज्यातील १०० पेक्षा अधिक सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी दिला. महाराष्ट्राची बलस्थाने भक्कम करण्यासाठी पाठीशी उभे राहिल्याबद्दल फडणवीस यांनी धन्यवाद दिले आहेत.
गेल्या १२ वर्षात महाराष्ट्राच्या विकासासाठी आपला पाठिंबा आणि योगदान राज्य कधी विसरणार नाही. विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीत आपल्या नेतृत्वात महाराष्ट्र ठामपणे आपल्या पाठिशी उभा असेल, असा विश्वास फडणवीस यांनी मोदी यांना पाठवलेल्या पत्रामध्ये व्यक्त केला आहे.
