मुंबई : विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी नारीशक्तीचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. देशाच्या विकासाच्या वाटचालीत नारीशक्तीचे योगदान महत्त्वाचे असून ही नारीशक्ती ज्यावेळी संसाधन म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सहभागी होईल, तेव्हाच भारत पूर्णपणे विकसित होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.देशात सर्वात पहिले एक कोटी लखपती दीदी महाराष्ट्रातच झाल्या पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर आयोजित महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे उदघाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. राज्यात ५० लाख लखपती दीदी तयार होत आहेत. महिलांशी संबंधित असलेल्या सर्व यंत्रणा ‘पावर हाऊस’ आहे. या महिला शक्तीच्या योगदानातून शासनाने सुरू केलेली ३०० कोटी वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करायची आहे. उमेदच्या माध्यमातून यासाठी एक योजना तयार करण्यात यावी. या योजनेच्या माध्यमातून महिला बचत गटांना नर्सरी तयार करण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात येईल. नर्सरी तयार करण्यापासून झाडे लावणे आणि त्याची निगा राखणे यासाठी लागणारा पण खर्च शासन स्तरावरून देण्यात येईल. अशा महिला बचत गटांना वृक्ष लागवडीतून व्यावसायिक स्वरूपात मिळकत देखील होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जागतिक दर्जाच्या प्रदर्शनाशी महालक्ष्मी सरस प्रदर्शनाची तुलना होऊ शकते, अशा प्रकारचे स्वरूप या प्रदर्शनाच्या आयोजनाला देण्यात आले आहे. राज्यात संबंधित विभाग आणि यंत्रणेच्या माध्यमातून महिला बचतगटांची मोठी चळवळ सुरू आहे. या चळवळीशी कोट्यावधी महिला जोडल्या गेल्या आहेत. बचतगटांच्या माध्यमातून अनेक महिलांनी आपली उत्पादने तयार केली आहेत. त्यासाठी बाजारपेठही मिळवली आहे. कुटुंबासोबतच बचतगट सक्षम करण्याचे पंतप्रधान मोदी यांना अपेक्षित असलेले काम या महिलांनी केले आहे.

देशात ई-कॉमर्स मोठ्या वेगाने वाढत आहे. उमेद मार्ट या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महिला बचतगटांच्या उत्पादनांना ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर १००० पेक्षा जास्त वस्तू आहेत. राज्यातील नागरिकांनी उमेद मार्ट या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरूनच खरेदी करावी, असे आवाहन फडणवीस यांनी केले. महिला बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी २० जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलचे काम सुरू करण्यात आले आहे. उर्वरित 16 जिल्ह्यांमध्ये मॉलचे काम सुरू करण्यात येणार आहे . काही वर्षात उमेद मॉलचे जाळे तालुका स्तरापर्यंत विस्तारित करायचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात महिला बचत गटांच्या माध्यमातून ‘उमेद’ ३९ हजार ५५८ गाव खेड्यात पोहोचले आहे. महिला बचत गटांच्या चळवळीमुळे ६४ लाख कुटुंबाना लाभ मिळाला आहे. राज्यात सध्या ६ लक्ष ६८ हजार बचत गट आहेत. महिला बचत गटांसोबतच राज्यात ३३१ महिला शेतकरी कंपन्या आहेत असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. यावेळी कौशल्य विकास,उद्योजकता व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा, ग्राम विकास व पंचायतराज राज्यमंत्री योगेश कदम, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर उपस्थित होते.