Devendra Fadnavis chairs Maharashtra Police Conference to discuss Drugs Free mission and AI integration : राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद आज मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा आणि सादरीकरण करण्यात आले. या परिषदेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या परिषदेनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिषदेत झालेली चर्चा आणि घेण्यात आलेले निर्णय याबद्दल माहिती दिली. यावेळी राज्यात ड्रग्ज विरोधात एक मोठी मोहिम राबवली जाणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

या परिषदेबद्दल माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मी पोलीस विभागाचे अभिनंदन केले की, त्यांनी सातत्याने प्रयत्न करून महाराष्ट्रात माओवाद हा जवळपास संपुष्टात आणला. आमच्या जवळपास २४४ पोलिसांनी हा माओवाद संपवण्याकरिता शहिदी दिली. आज महाराष्ट्र माओवादापासून मुक्त केल्याबद्दल मी पोलिसांचे अभिनंदन देखील केले आणि ज्या-ज्या लोकांनी किमान तीन वर्ष सी-६० या आपल्या माओवाद्यांच्या विरोधात लढणाऱ्या फोर्समध्ये काम केलं आहे, त्या सगळ्यांना सी-६० मेडल देण्याचा निर्णय आज मी घोषित केला आहे.”

“आपल्याकडे तंत्रज्ञान फार मोठ्या प्रमाणात आहे. विशेषतः आर्टिफिशीयल इंटेलिजन्सचा उपयोग करून आपण मोठ्या प्रमाणात काही टूल्स तयार केले आहेत, ज्यामुळे एखाद्या गुन्ह्यात एफआयआरपासून ते चार्जशीटपर्यंत अनेक गोष्टींमध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो. म्हणून आज मी एक टास्क पोलीस महासंचालकांना दिला आहे की, पुढच्या सहा महिन्यांत ही सगळी प्रोसेस डिजीटाइज झाली पाहिजे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अपराध सिद्धीचा दर हा महाराष्ट्राने चांगल्या पद्धतीने वाढवला आहे. मात्र अद्यापही निश्चित केलेल्या ध्येयापेक्षा आपण पुष्कळ मागे आहोत. आपल्याला ९५ टक्क्यांपर्यंत अपराध सिद्धीचा दर घेऊन जायचा आहे. आता आपण ५० टक्क्यांवर आहोत. पोलिसांनी प्रयत्न करून राज्यात अपघातांमध्ये कमतरता आणली आहे. पण त्यावर अजून चांगलं काम करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने काही प्रयोग झाले आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ड्रग्जविरोधात मोहिम राबवणार

शाळा-कॉलेजचे कॅम्पस ड्रग्जमुक्त करण्यासाठी आगामी काळात मोहिमेची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. “ड्रग्जच्यासंदर्भात, पुढच्या काळात ‘ड्रग्ज फ्री कॅम्पस’ ही संकल्पना अधिक दृढतेने कशी राबवायची या संदर्भात आज विचार झाला आणि त्यासंदर्भात एक वेगळं सादरीकरण आणि त्याची स्टॅटर्जी ही डीजी तयार करून आमच्यासमोर ठेवणार आहेत. पुढच्या काळात ड्रग्जच्या विरोधात एक खूप मोठी लढाई महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय आज आपण घेतला आहे,” असे फडणवीस म्हणाले.

प्रमुख गुन्ह्यांच्या संदर्भात कुठल्या जिल्ह्यांचे काम चांगले आहे आणि कुठल्या जिल्ह्यांमध्ये काम करण्याची आवश्यकता आहे, याचे ग्रेडेशन करण्यात आलेले आहे. पुढच्या सहा महिन्यात आजच्या राज्याच्या सरसरीच्या वर प्रत्येक जिल्ह्याने जायचं असं लक्ष्य ठरवण्यात आले आहे. चांगलं काम केल्याबद्दल डीजींचा एक पुरस्कार दर महिन्याला दिला जाईल असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच पोलिसांचे कल्याण तसेच त्यांच्यासमोरची आव्हाने, पुढील धोरण या सगळ्या गोष्टींवर या परिषदेत चर्चा झाल्याचे फडणवीस म्हणाले.