मुंबई : राज्यात सर्वदूर उच्चशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरिता विद्यापीठांच्या बृहद् आराखड्याबाहेरील ठिकाणी नवीन महाविद्यालये सुरू करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची (माहेड) बैठक मंत्रालयात झाली. यावेळी विद्यापीठांच्या २०२७-२८च्या वार्षिक योजनेसाठी पंचवार्षिक आराखड्याबाहेरील ठिकाणांचा समावेश करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच, विद्यापीठांनी पात्र ठरविलेल्या ठिकाणांची छाननी करण्याकरिता उपसमिती नेमण्याचे निर्देश दिले. ही नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि विविध शैक्षणिक संस्थांकडून विद्यापीठांकडे प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार करावा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. सर्व आवश्यक निकष तपासून सरकारला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
यावेळी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया आणि सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही अडचणी येऊ नयेत, तसेच संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि विद्यार्थीपूरक करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.
सीईटी परीक्षा केंद्रांची सुरक्षितता आणि नियंत्रणावर भर
सीईटीबाबत विद्यार्थ्यांना अधिक स्पष्टता मिळण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा कराव्यात. विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या ठिकाणी परीक्षा केंद्र उपलब्ध होण्यासाठी सीईटी परीक्षा केंद्रांची संख्या वाढवावी. मात्र, परीक्षा केंद्रांची संख्या वाढविताना परीक्षेची सुरक्षा आणि पारदर्शकता कायम राहणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रांवर सीईटी सेलचे अधिक प्रभावी नियंत्रण व देखरेख राहील, अशी व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मुलींच्या मोफत उच्च शिक्षणामुळे अभियांत्रिकी प्रवेशातील प्रमाणात वाढ
राज्य शासनाने मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये मुलींच्या प्रवेशाचे प्रमाण गेल्या चार वर्षांत वाढले आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये एकूण प्रवेशांपैकी ३२.७२ टक्के प्रवेश मुलींचे होते. हे प्रमाण २०२६-२७ मध्ये वाढून ३७.२७ टक्के झाले आहे.
