Marathi Bhasha Gaurav Diwas Devendra Fadnavis Speech: मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आज विधानभवनात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमधील प्रमुख नेतेमंडळींनी आपली भूमिका मांडली. विधानसभेचं कामकाज सुरू होण्याआधी सकाळी विधानभवनात ‘जावे विनोदाच्या गावा’ या नावाच्या कार्यक्रमात विविध प्रकारची विनोदी शैलीतील सादरीकरणे पार पडली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील खास त्यांच्या शैलीत केलेल्या कोट्यांमुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

“विधिमंडळातील विनोद कमी केले तर…”

यावेळी मुख्यमंत्र्यांनी विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही ठिकाणी सदस्यांच्या भाषणांदरम्यान व प्रश्नोत्तरांमध्ये निर्माण होणाऱ्या विनोदाचा विशेष उल्लेख केला. “विधिमंडळ हेही एकप्रकारे अनेक विनोदांना जन्म देणारं असतं. आपलं राजकीय क्षेत्र, तिथे घडणाऱ्या घटना, विनोद जर कमी केले, तर कदाचित मराठी नाटक-चित्रपट यांच्या कथानकांमध्ये ५० टक्के घट येईल इतका मसाला आपण सगळे मिळून साहित्यिकांना देत असतो. त्यामुळे आपणदेखील साहित्याची निर्मिती करत असतो”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हल्ली घाबरत-घाबरत विनोद केले जातात – देवेंद्र फडणवीस

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी हल्ली विनोद करताना नेतेमंडळी घाबरतात, असं विधान केलं. “पूर्वी विधानमंडळात भाषणांमध्ये विनोद, कोट्या, व्यंग अशा अनेक छटा पाहायला मिळायच्या. अलिकडच्या २०-२५ वर्षांत विलासराव, गोपीनाथ मुंडे यांच्या भाषणांमध्ये एकमेकांवर केलेल्या कोट्या, त्यातून निर्माण होणारे विनोद असायचे. पण दुर्दैवाने अलिकडच्या काळात अनेकदा विनोदाला अस्मितेशी जोडलं जातं. त्यामुळे त्या विनोदातलं मर्म निघून जातं. घाबरून-घाबरून माणूस विनोद करायला लागला आहे की आपण जे बोलतोय त्यातून काय अर्थ निघेल आणि दिवसभर माध्यमांमध्ये काय चालेल. त्यामुळे आपल्या भाषणांतला निखळ आनंद कमी झालेला आहे”, अशी खंत देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात बोलून दाखवली.

भाषेमुळे मुंबईत सुरुवातीला फार अडचणी आल्या!

मुंबईत आल्यानंतर सुरुवातीच्या काळात आपल्या मराठीमुळे फार अडचणींचा सामना करावा लागल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. “आपली मराठी भाषा दर ५-७ किलोमीटरवर बदलते. मी मुंबईत आलो तेव्हा सुरुवातीच्या काळात मला फार अडचणी होत्या. कारण शब्दाशब्दाला ‘का बे’, ‘साल्या’ असं ‘सांस्कृतिक’ मराठी मी बोलायचो. पण इथे आल्यावर मला लक्षात आलं की ही संस्कृती मुंबईला पटण्यासारखी नाही. पुण्यात तर आपल्याला बहिष्कृतच केलं जाईल असं मला वाटलं. त्यामुळे मी हळूहळू स्वत:ला चांगलं मराठी कसं बोलता येईल या दिशेनं नेलं. पण प्रत्येक भागातल्या मराठीचा आपला गोडवा आपल्याला कायम ठेवायचा आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा
Devendra Fadnavis Speech: मुख्यमंत्री असताना मंत्र्यांना काही अधिकारच नसतो! फडणवीसांच्या टोलेबाजीने मंत्रिमंडळात अस्वस्थता

“आज आपण मराठीचा गौरव करत आहोत. यानिमित्ताने आपली भाषा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवं यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. लोकसाहित्य, लोककला, लोकनाट्य, लोकगीतं आपल्याला जिवंत कशी ठेवता येतील हे बघावं लागेल. जगात इंग्रजी सर्वात मोठी भाषा आहे. कारण ती राज्यकर्त्यांची भाषा होती. राज्यकर्त्यांची भाषा ही जगाची भाषा होते. त्यामुळे आपणही आपल्या भाषेला ज्ञानभाषेत रुपांतरीत करायला हवं. मराठी बोलणाऱ्याला मराठीमुळे प्रगती करता येते असा भाव आपण निर्माण करायला हवा”, असंदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.