मुंबई : ‘ज्या भाषेतून व्यवहार चालतो, रोजगार मिळतो, ती भाषा प्रगतीचा भाव जागृत करते. जगामध्ये ज्ञानभाषा असलेल्या भाषांच पुढे प्रवाहित होत असल्याचा इतिहास आहे. त्यामुळे आपल्या अभिजात भाषेला ज्ञानभाषेत रूपांतरित करून समृद्ध अशी मराठी भाषा आपण पुढील पिढीपर्यंत नेऊ या, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित ‘ जावे विनोदाच्या गावा’ या विशेष कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या काळात मराठी भाषा शुद्ध होण्यासाठी शब्दकोश तयार केला. त्यावेळी प्रशासन चालविताना मराठीवर फारशी, अरबी या भाषांचे आक्रमण होते. त्यामुळे मराठी भाषेचे शुद्धीकरण करण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याचे सांगतून फडणवीस यांनी, मराठी भाषेचा अभिमान हा सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून सुरू होतो. सुरुवातीच्या काळातील आद्य ग्रंथांमधून आपली मराठी भाषा किती अभिजात आहे, हे आपल्याला पाहायला मिळते असे सांगितले.

महाराष्ट्राच्या विधान मंडळात चालत असलेले कामकाज राजकीय क्षेत्र साहित्य निर्मिती करणारे आहे. या कामकाजामधूनच अनेक चित्रपट, नाट्य यांच्या कथानकांना विषय मिळत असतात. मराठीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिजात भाषेचा दर्जा देऊन राजाश्रय मिळवून दिला आहे. मराठी भाषा, आपल्या भाषेतील साहित्य आणि लोककला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही फडणवीस यांनी केले.

तर मराठी माणसाच्या रक्तातच विनोद आहे. विनोद हा समाजामध्ये माणूस जोडणारा पूल आहे. त्यामुळे संकटातही जो विनोद शोधतो, तोच खरा मराठी माणूस आहे, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी मराठी माणसाचा गौरव केला.

आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे ही मराठी भाषेतील विनोदाची दोन शिखरे आहेत. त्यांच्या कर्तुत्वाची उंची हिमालयाएवढी आहे. मराठीचा वापर सर्व क्षेत्रात व्यवहाराची भाषा म्हणून केला पाहिजे. मराठीच्या समृद्धीची पताका सातासमुद्रापार आपल्याला फडकवत ठेवायची आहे. उपलब्ध साधनांचा पुरेपूर उपयोग करून मराठीची समृद्धी वाढविली पाहिजे. समृद्ध मराठीचा वारसा पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया, असे आवाहनही शिंदे यांनी केले.

मराठी भाषेला समृद्ध करायचे असेल, पुढे न्यायचे असेल तर तंत्रज्ञान, संशोधने ही मराठी भाषेतूनच झाली पाहिजेत. तेव्हा मराठी ही ज्ञानभाषा होईल, असा विश्वास राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला.

मराठी ही देशातील अधिकृत २२ भाषांपैकी एक असून देशात १ हजार ६५२ बोलीभाषा आहेत. मराठी भाषिक लोकसंख्या ही देशात तिसऱ्या आणि जगामध्ये दहाव्या क्रमांकावर आहे. मराठी भाषेला समृद्ध आणि पुढे नेण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात आला. आता ही भाषा समृद्ध करणे आणि पुढील पिढीपर्यंत टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचेही नार्वेकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीलम गोऱ्हे यांनी तर आभार प्रदर्शन मराठी भाषा समिती प्रमुख आशुतोष काळे यांनी केले.