गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. या नेत्यांच्या भेटीगाठी सुरु असतानाच आता आज माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी या भेटीत झालेल्या चर्चेबद्दलची माहिती दिली.

अमित शाह यांच्या संसदेतल्या कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली. राज्यातले अनेक प्रमुख भाजपा नेते दिल्लीतच आहेत. मात्र, फडणवीस यांनी एकट्याने अमित शाहांची भेट घेतल्याने या चर्चा जोर धरत आहेत. एखाद्या समाजाला मागास ठरविण्याचे अधिकार हे राज्यांनाच असावे,अशा प्रकारची मागणी आपण केली आहे. आज त्यासंदर्भातील विधेयक संसदेत येते आहे. हे विधेयक लवकरात लवकर एकमताने मंजूर व्हावे,अशी मागणी अमित शाह यांच्याकडे केल्याची माहिती त्यांनी दिली.

तर रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मराठा आरक्षण आणि इतर राजकीय विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील हेही शनिवारपासून दिल्लीत आहेत. काल त्यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेला उत्तर दिले होते. आमच्या पक्षात तशी चर्चा नाही. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचारही नाही. खरं तर भाजप काय आहे हे तुम्हाला कळलं नाही. सर्वसामान्य माणसांनाही भाजप समजली पाहिजे, असं सांगतानाच दर तीन वर्षाने आमच्या पक्षात फेरबदल होतो, असं पाटील म्हणाले होते.

काँग्रेसला वर्षभरापासून पक्षाध्यक्ष मिळत नाही. भाजपमध्ये तसं नाही. त्यामुळे भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या या निव्वळ चर्चा असून त्यात काही तथ्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.