मुंबईत ग्रंथाली तर्फे प्रशांत कुलकर्णी यांच्या ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम गुरुवारी पार पडला. या कार्यक्रमाच्यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी झालेल्या भाषणांमध्ये देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या तिन्ही नेत्यांनी आपल्या खास शैलीत भाष्य करत राजकीय टोलेबाजी केली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक किस्सा सांगत मिश्किल टिप्पणी केली. फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांवर भाष्य करताना एक मजेशीर किस्सा सांगितला. ‘माझं नाक मोठं दाखवा, कान मोठे दाखवा, पण पोट मोठं दाखवू नका’, अशी विनंती आपण राज ठाकरेंना केली होती असा किस्सा फडणवीसांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या या भाषणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“मी एकदा राज ठाकरेंना विनंती केली होती की, तुम्ही माझं कधी व्यंगचित्र काढलं तर माझं नाक मोठं दाखवा, कान मोठे दाखवा, पण पोट काही मोठं दाखवू नका. अशी विनंती मी त्यांना केली होती, त्यांनी माझी विनंती ऐकली आणि त्यानंतर माझं पोट मोठं दाखवलं नाही. मात्र, बाकी लोक ऐकतच नाहीत. त्यांना फक्त माझं पोट दिसतं. पण अलिकडच्या काळात मी तेही कमी केलंय. त्यामुळे आता काही व्यंगचित्रकार त्यातून मला सोडतील असा मला विश्वास आहे”, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मिश्किल टिप्पणी केली.

“ही व्यंगचित्राची ताकद आहे” : फडणवीस

“एका व्यंगचित्राची शक्ती किती आहे, तर एका व्यंगचित्रकाराने व्यंगचित्र काढलं, त्यामध्ये नेपोलियन आणि ब्रिटिश प्राइम मिनिस्टर बसलेले आहेत. त्यांच्यामध्ये केक किंवा अॅपल पेस्ट्री अशी पृथ्वी आहे, ज्यामध्ये पृथ्वीचे ते तुकडे करत आहेत असं त्या व्यंगचित्रात दिसत होतं. ते व्यंगचित्र पाहिल्यानंतर नेपोलियनने सांगितलं की युरोपची सेना माझं जेवढं नुकसान करू शकली नाही, तेवढं नुकसान आणि बदनामी एका व्यंगचित्राने केली. ही व्यंगचित्राची ताकद आहे”, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.

‘२०१९ नंतर बोलवलं नाही…’, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

“हास्यरेषा या अत्यंत सुंदर पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उपस्थित असलेले उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आशिष शेलार आणि बंधू भगिनींनो सर्वच लोक डाव्या बाजूला गेले म्हणून जाणीवपूर्वक उजवीकडे आलो. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की व्यंगचित्रकारांच्या कार्याचा गौरव करणारी आणि त्यांच्या इतिहासाचं संकलन करणारा ग्रंथ प्रशांत कुलकर्णींनी उत्तमपणे संपादित केला. या प्रकाशनासाठी मला राज ठाकरेंचा फोन आला. मग प्रशांतजीही मला भेटले. मलादेखील अतिशय आनंद वाटला. मगाशी आशिषजी असं म्हणाले की राज ठाकरेंनी फोन केला की देवेंद्रजी येतात. आशिषजी, २०१९ पर्यंत उद्धवजींनी जेव्हा-जेव्हा फोन केला तेव्हा तेव्हा मी गेलो. २०१९ नंतर बोलवलंच नाही, नाहीतर गेलो असतो. मी वाटच पाहात राहिलो. कार्यक्रमात शेवटचं भाषण देण्याचा फायदा हा आहे की यावर राज ठाकरे उत्तर देऊ शकणार नाहीत. त्यामुळे आजतरी मी काहीही बोललो तरी प्रति षटकार येणार नाही”, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला.