scorecardresearch

“शरद पवार बोलल्यानंतर उद्धव ठाकरेंना बोलावंच लागतं, त्यामुळे…”, देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला!

देवेंद्र फडणवीस म्हणतात, “बोलताना प्रत्येकानं विचार करून बोललं पाहिजे. शेवटी…!”

“शरद पवार बोलल्यानंतर उद्धव ठाकरेंना बोलावंच लागतं, त्यामुळे…”, देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला!
देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला!

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानावरून सध्या राज्यातलं राजकारण तापलं आहे. “शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श आहेत, नितीन गडकरी, शरद पवार हे आजच्या काळातले आदर्श आहेत”, असं विधान भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. त्यावरून राज्यपालांना विरोधी पक्षांकडून लक्ष्य केलं जात आहे. संभाजीराजे छत्रपती, उदयनराजे भोसले, काँग्रेस, ठाकरे गट, शिंदे गट अशा सगळ्यांनी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका मांडली. यानंतर आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन यावरून राज्यपालांना आणि भाजपालाही लक्ष्य केलं. त्यासंदर्भात माध्यमांशी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. तसेच, यावेळी बोलताना फडणवीसांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनाही प्रत्युत्तर दिलं.

“कर्नाटकचे मुख्यमंत्री सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे नाहीत”

“सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालय योग्य निर्णय घेईल याची आम्हाला अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयापेक्षा कुणीही मोठं नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्रीही मोठे नाहीत किंवा इतर कुणीही मोठं नाही. त्यामुळे त्यांनी काहीही दावा ठोकला, तरी महाराष्ट्रातलं एकही गाव जाणार नाही. आमचा सीमाभाग आम्हाला परत मिळेल ही मला अपेक्षा आहे”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

“मी कुठलंही चिथावणीखोर वक्तव्य केलेलं नाही. मी एवढंच सांगितलं की बेळगाव, कारवार, निपाणीसह इतर गावांवर आम्ही दावा सांगितला आहे. तो दावा काही आज सांगितलेला नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयात त्यासाठी भांडत आहोत. ती भूमिका मी मांडली. त्या मागणीला चिथावणीखोर म्हणणं चुकीचं आहे”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

“कुणीही यावं, टपली मारून जावं आणि आम्ही…”, उद्धव ठाकरेंचं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर टीकास्र, शिंदे सरकारवरही आगपाखड!

फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला!

“माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की आमच्यापेक्षा जास्त काळ कर्नाटक, महाराष्ट्र आणि केंद्रात काँग्रेस आणि मित्रपक्षांचं सरकार होतं. मग तेव्हा प्रश्न सुटला का? त्यामुळे बोलताना प्रत्येकानं विचार करून बोललं पाहिजे. शेवटी वेगवेगळी सरकारं कर्नाटकमध्ये आपण पाहिली. त्यांनी सातत्याने तीच भूमिका ठेवली आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या सरकारांनीही तीच भूमिका ठेवली आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात पक्षाचा वाद सीमावादात आपण कधीही आणला नाही. आताही कुणी आणू नये. त्यामुळे सीमेबाबतचा आपला वाद खिळखिळा होईल”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.

“उदयनराजेंच्या पत्रामुळे हे खडबडून जागे झाले”

“छत्रपती उदयनराजे यांनी पत्र लिहिल्यानंतर शरद पवारांच्या लक्षात आलं की आपल्यासमोर घटना घडली आणि आपण त्यावर कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. उदयनराजेंनी लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया आज दिली. शरद पवारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर उद्धव ठाकरेंना प्रतिक्रिया द्यावीच लागते. त्यानुसार त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता त्याला राजकीय रंग कसा देता येईल? याचा प्रयत्न सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज उभ्या भारताचं दैवत आहेत. त्यामुळे त्याबद्दल कुठला वादही होऊ शकत नाही. त्यावर कुणी राजकाऱण करणं हेही योग्य होणार नाही. आज हे उदयनराजेंच्या पत्रामुळे खडबडून जागे झाले आहेत”, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या