काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत घेतलेल्या भूमिकेवरून गेल्या काही दिवसांत राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपाकडून राहुल गांधींच्या या भूमिकेवर परखड शब्दांत टीका केली जात आहे. महाराष्ट्रातही सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाकडून यावर तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मालेगावातील सभेत बोलताना सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, अशा शब्दांत राहुल गांधींना इशारा दिला आहे. त्यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना इशारा

उद्धव ठाकरे किंवा ठाकरे गट राहुल गांधींच्या सावरकरांबाबतच्या भूमिकेवर मूग गिळून गप्प असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात होता. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी मालेगावातील सभेत राहुल गांधींना इशारा दिला. “राहुल गांधींना एक सांगायचं आहे. तुम्ही कन्याकुमारी ते काश्मीर चाललात. संजय राऊत आणि आम्हीही तुमच्याबरोबर होतो. ही लढाई लोकशाहीची आहे. मात्र, राहुल गांधींना जाहीरपणे सांगत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत आहेत. त्यांचा अपमान पटणारा नाही. एकत्र लढायचं तर दैवतांचा अपमान सहन करणार नाही. देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. त्याच्यात फाटे फुटू देऊ नका“, असं उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेवर आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत टोला लगावण्यात आला. “कालच्या जाहीर सभेत ते म्हणाले की सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. म्हणजे काय करणार? बाळासाहेबांनी तेव्हा सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या थोबाडीत लावली होती. राहुल गांधींच्या थोबाडीत देऊन ही हिंमत तुम्ही दाखवणार का? बोलून काय होणार? तुमच्या कृतीतून हे दिसायला हवं”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना टोला!

यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. “माझ्यासोबत चालत आल्यामुळे असं घडत असेल, तर मी रोज काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेच्या एकेका नेत्याला दरवाजापासून विधानभवनापर्यंत सोबत चालत नेईन. म्हणजे ते सगळे सावरकर की जय म्हणतील”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“सत्तेला लाथ मारण्याची त्यांच्यात हिंमत नाही. त्यामुळे फक्त भाषणांमध्ये सावरकर जिवंत राहतील. कृतीमध्ये सावरकर दिसणार नाहीत. पण शिवसेना आणि भाजपा प्रत्येक जिल्ह्यात आणि विधानसभा मतदारसंघात एकीकडे राहुल गांधींचा निषेध करेल आणि दुसरीकडे सावरकर गौरव यात्रा काढेल. यातून सावरकरांनी केलेलं कार्य आम्ही पुन्हा एकदा लोकांसमोर आणू”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis mocks uddhav thackeray on rahul gandhi veer savarkar statement pmw
First published on: 27-03-2023 at 16:53 IST