मुंबई : आजच्या घडीला सर्वत्र ए आय चा बोलबाला आहे. राज्यातील ए आय मधील प्रगती पाहता महाराष्ट्र राज्य हे जगात ए आय तंत्रज्ञान नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
देशाच्या आर्थिक राजधानीची ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी यामुळे आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात ( एआय) नेतृत्व करेल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
वांद्रे कुर्ला संकुलात ‘मुंबई टेक वीक २०२६’ चे फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी घेण्यात आलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी हा दृढ विश्वास व्यक्त केला. शासनाने १० हजार कोटी रुपयांची एआय गुंतवणूक, दीड लाख रोजगार निर्मिती, सहा ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ आणि विशेष ‘एआय इनोव्हेशन क्षेत्रे’ उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
एआय क्षेत्रातील संशोधन आणि नवकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य सरकार ‘कम्प्युट-अॅज-अ-सर्व्हिस’ सुविधा निर्माण करत आहे. या सुविद्याने नवउद्योजक आणि संशोधकांना २ हजार जीपीयू उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उच्च क्षमतेच्या कम्प्युटिंग सुविधा परवडत नसल्यास नवकल्पना थांबते. त्यामुळे शासन थेट पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे, असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सरकार फक्त धोरणात्मक चौकट तयार करू शकते. खरी स्टार्टअप परिसंस्था संस्थापक आणि उद्योजक घडवतात. डिसेंबर २०२२ मध्ये टेक उद्योजकांच्या संघटनेची संकल्पना प्रथम मांडण्यात आली होती, त्यावेळी त्यांच्या कामातील ऊर्जा आणि दृष्टी पाहून हा उपक्रम मोठा होईल, असा विश्वास वाटला होता.आता प्रत्येक वर्षी अधिकाधिक संस्थापक, गुंतवणूकदार आणि जागतिक कंपन्या महाराष्ट्राशी जोडल्या जात आहेत. सलग तीन वर्षे महाराष्ट्र हा गुंतवणूक आणि स्टार्टअप संख्येनुसार देशातील अग्रगण्य राज्य ठरले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
देश, विदेशातून मुंबई टेक वीकमध्ये सहभागी झालेल्या स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान कंपन्यांना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीचे आवाहन केले. तंत्रज्ञान आणि एआय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा सर्वोत्तम काळ आहे. एआयसाठी महाराष्ट्र ही सर्वोत्तम कार्यभूमी आहे. येथे आधीच सक्षम परिसंस्था तयार झाली आहे. महाराष्ट्रासाठी काम करा, भारतासाठी काम करा आणि जगासाठी नवकल्पना घडवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. शासन केवळ इनक्युबेशन आणि अॅक्सेलरेशनपुरते मर्यादित नसून ‘फंड ऑफ फंड्स’च्या माध्यमातून गुंतवणूक सहाय्यही देत आहे. शासन भागीदार म्हणून तुमच्यासोबत उभे राहण्यास तयार आहे, असे आश्वासन फडणवीस यांनी नव उद्योजकांना दिले.
शासनाच्या विविध विभागांमध्ये एआयच्या वाढत्या वापराची उदाहरणे फडणवीस यांनी दिली. यावेळी राज्य सरकारच्या ‘महा-विस्तार’ या शेतकरी अॅपचा विशेष उल्लेख केला. हे शेतकऱ्यांसाठी एक ‘वन स्टॉप सोल्युशन’ आहे. भारत एआय परिषदेत केंद्र सरकारने त्याला देशातील सर्वोत्तम शेतकरी उपाय म्हणून गौरविले आहे. आता ‘इंडिया-विस्तार’ संकल्पना त्याच धर्तीवर विकसित होत आहे. बांधकाम परवानगी प्रक्रियेत एआय आधारित प्रणालीमुळे पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गुन्हे तपास आणि न्यायप्रक्रियेसाठी तयार करण्यात आलेल्या ‘क्राईम ओएस’ प्लॅटफॉर्मचा उल्लेख फडणवीस यांनी केला. या प्रणालीमुळे तपास, चार्जशीट तयार करणे आणि न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत वेगवान होणार आहे. पूर्वी १५ हजार पानांच्या आरोपपत्रासाठी तीन,चार महिने लागत; आता एआयमुळे ते दहा-बारा दिवसांत काम शक्य होणार आहे.
वैद्यकीय विमा योजनांतील गैरव्यवहार शोधणे, एचआर स्टॅकद्वारे शासकीय मनुष्यबळ व्यवस्थापन सुधारणे, वाहतूक नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन आणि निगराणी व्यवस्था यांसारख्या क्षेत्रांतही एआयचा प्रभावी वापर सुरू आहे. राज्य सरकारने विविध विभागांसाठी ५० एआय इंजिन विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.
