Ashok Kharat Case SIT Tejaswi Satpute: भोंदूबाबा अशोक खरातला विविध गुन्ह्यांखाली अटक झाल्यानंतर आज त्याला पुन्हा एकदा नाशिक न्यायालयात हजर केले असता २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतही निवेदन दिले. डिसेंबर २०२५ मध्ये पहिल्यांदा हे प्रकरण समोर आल्यानंतर याबद्दल गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि १३ मार्च रोजी आधीच एसआयटीची स्थापना करण्यात आली, असे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान एसआयटीचे नेतृत्व महिला अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे का दिले? यामागची भूमिकाही फडणवीस यांनी सांगितली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सविस्तर निवेदन दिल्यानंतर शिवसेनेचे (ठाकरे) नेते भास्कर जाधव यांनी त्यावर प्रश्न उपस्थित केला. खरातने अतिशय विकृत असे कृत्य केले आहे. याप्रकरणी खरातची संस्था आणि त्याच्या संपत्तीचीही चौकशी होत आहे. पण खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली.
याचबरोबर राजकारणातील काही जणांची नावे समोर येत आहेत. त्यांचे खरातबरोबरचे फोटोही समोर आले आहे. महराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुरोगामी राज्य आहे. आपण अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा केला आहे. मग यात जे राजकारणी गुंतले आहेत, त्यांचीही चौकशी करणार का? असाही प्रश्न भास्कर जाधव यांनी विचारला.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
भास्कर जाधव यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्या ज्या लोकांविरोधात पुरावे मिळतील, त्या सर्वांची चौकशी केली जाईल. पण आपण सर्व राजकारणी आहोत, राजकारणात अनेकांबरोबर फोटो असतात. त्यावरून दोषी ठरवता येत नाही. पण आपण डिलिटेड डेटाही काढत आहोत. यातून खरातला कुणी मेसेज केला आहे का? त्याच्याशी व्यवहार केला आहे का? याचीही माहिती बाहेर आणली जाईल.”
तेजस्वी सातपुतेंकडे तपास का दिला?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, आपण जाणीवपूर्वक एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता पाहूनच त्यांना एसआयटीचे प्रमुखपद देण्यात आले. त्यांचा ट्रॅक रेकॉर्डही चांगला आहे. खरातला ज्या कुणी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत केली आहे, कुठलीही मदत केली असेल तरी त्यांना धडा शिकवला जाईल.
