Devendra Fadnavis On Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी एसआयटी करत असून दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अशोक खरातबरोबर अनेक मोठ्या नेत्यांचे फोटोही समोर आले आहेत. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपाने राजकारण तापलं आहे. याच अशोक खरात प्रकरणाबाबत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना महत्वाची माहिती सांगितली आहे.
अशोक खरातला पोलिसांनी अटक कसं केलं? अटक करण्याआधी काय गुप्तता पाळण्यात आली होती? अशोक खरात दुसऱ्या देशात पळून जाऊ नये म्हणून काय काळजी घेण्यात आली होती? याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात महत्वाची माहिती सांगितली. ‘पोलिसांनी ट्रॅप लावून ही कारवाई केली’, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या संदर्भात सगळी माहिती काढण्याचं काम सुरू आहे. हे जे प्रकरण घडलं, ते अतिशय गंभीर आहे. या अशोक खरातने त्याच्या तथाकथित शक्तीचा उपयोग-दुरुपयोग करून आणि दिशाभूल करून अनेक महिलांबरोबर दुष्कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे.या प्रकरणाबाबत मी सभागृहाला अवगत करू इच्छितो की या प्रकरणाची कारवाई पोलिसांनी ट्रॅप तयार करून केली आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“या घटनेत महिलांचा समावेश असल्यामुळे, म्हणजे महिलांची फसवणूक झाली, पण त्या पुढे यायला तयार नव्हत्या. त्यामुळे त्यांना योग्य धीर दिल्यानंतर त्यातील काही महिलांनी तक्रार दाखल केली. आणखी काही महिला तक्रार देतील. मी या ठिकाणी एवढंच सांगतो की या प्रकरणात कारवाई जरी आता झाली असली तरी या कारवाईची तयारी आधीपासून सुरू होती. अशोक खरातच्या अटकेच्या आधी म्हणजे १० मार्च रोजी दुसऱ्या जिल्ह्यातून आपण एका तक्रारीचा उपयोग करून अशोक खरातला बाहेर जाता येऊ नये, यासाठी एलओसी (लूक आउट सर्कुलर) देखील जारी केली होती”, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
“या प्रकरणात आपण पूर्णपणे कारवाई करत आहोत. या प्रकरणाबाबत उद्या सभागृहात सविस्तर निवेदन सादर करणार आहे. कारण आजही त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. माझी दोन्ही बाजूच्या आमदारांना विनंती आहे की हा राजकारणाचा मुद्दा नाही. कारण महिलांच्या प्रतिष्ठेचा हा प्रश्न आहे”, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अटकेनंतर अशोक खरात पोलिसांसमोर काय म्हणाला? व्हिडीओ समोर
अशोक खरातचा आता अटकेनंतरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अशोक खरातला व्यवस्थित चालता देखील येत नसल्याचं दिसत आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातची नाशिक पोलिसांनी एक प्रकारे वरात काढत त्याच्याकडून ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ असं वदवून घेतल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
भोंदूबाबा अशोक खरातला चौकशीसाठी पोलीस घेऊन जात असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र, यावेळी भोंदूबाबा अशोक खरातची अवस्था एवढी बिकट झाली आहे की त्याला चालणं सुद्धा कठीण झाल्याचं दिसत आहे. तसेच तो असं म्हणताना दिसत आहे की, ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’, असं तो म्हणत आहे. तसेच ‘आता माझ्यात ताकद राहिली नाही’, असंही अशोक खरात म्हणत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
