राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपाने पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. पण अखेर भाजपाने आपला उमेदवार जाहीर केला.
या निवडणुकीत महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या घडामोडींवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत महत्वाचं भाष्य केलं आहे. “भाजपाने घोषित केलेले उमेदवार विजयी होतील आणि बंडखोरी करणाऱ्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्याशी नक्कीच चर्चा केली जाईल,” असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, काही ठिकाणी महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता आहे. याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न विचारला. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “विधानपरिषदेसाठी भाजपाने तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केलेले आहेत. आम्हाला विश्वास आहे की या तिन्ही जागा आम्ही जिंकू. तसेच उर्वरित ठिकाणी आमचे मित्रपक्ष लढतील आणि ते देखील तेथून जिंकतील असा आम्हाला विश्वास आहे.”
बंडखोरी करणाऱ्यांबाबत फडणवीस काय म्हणाले?
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्यांची मनधरणी केली जाईल का? या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पक्षाने ज्याला उमेदवारी दिली, त्याने निवडणूक लढली पाहिजे. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी माघार घेतली पाहिजे. मात्र, तर कोणी बंडखोरी करणार असेल तर आम्ही नक्कीच त्यांच्याशी चर्चा करू”, असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं.
भाजपा की केंद्रीय चुनाव समिति ने महाराष्ट्र में होने वाले स्नातक और शिक्षक निर्वाचन क्षेत्रों के विधान परिषद् चुनाव 2026 हेतु निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की है। https://t.co/a6Rxazi5By
— BJP (@BJP4India) October 4, 2026
भाजपाचे तीन उमेदवार कोण आहेत?
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या तीन उमेदवारांची घोषणा केली. भाजपाने पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
पुणे पदवीधर मतदारसंघ : डॉ.स्मिता योगेश जाधव
नागपूर पदवीधर मतदारसंघ : सुधाकर कोहळे
पुणे शिक्षक मतदारसंघ : कौस्तुभ गावडे
