महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा पाहायला मिळत आहेत. यामुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेटची बैठक बोलावली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातले मंत्री उपस्थित होते. या बैठकीत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
महाराष्ट्रात दुष्काळ आहे, २६५ तालुक्यांतून आपण दुष्काळ जाहीर केला आहे. आता ट्रिगर १ आणि २ मध्ये आता आम्ही ३०६ तालुके घेतले आहेत. दुष्काळ नोव्हेंबरच्या शेवटी जाहीर होतो आणि डिसेंबरमध्ये मदत देतो. पण आताची परिस्थिती पाहता आपण मदत लवकर जाहीर केला आहे. बारा योजना आपण लागू केल्या आहेत. दिवाळी येते आहे, शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी कठीण आहे याची कल्पना आम्हाला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दिवाळीपूर्वी अग्रीम मदत म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रूपये जमा करणार
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ही अग्रीम मदत आहे. हे पैसे खात्यांमध्ये गेले पाहिजेत हा आमचा प्रयत्न असणार आहे. साडेतीन लाख शेतकऱ्यांची यादी कर्जमाफीसाठी आपण फायनल केली आहे. त्यावरही काम केलं आहे.
पाण्याच्या टँकरचं जीपीएसद्वारे ट्रॅकिंग होणार-मुख्यमंत्री
राज्यात आणखी ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. आता राज्यात एकूण ३०५ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांत १२ सवलती मिळत राहतील. कर्जमाफीचे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत. पिण्याचे पाणी देणाऱ्या टँकर्सची संख्या वाढतेय. मराठवाड्यात पाणीपातळी ३ मीटरपेक्षा खाली गेली आहे. मराठवाड्यात हवे तेवढे टँकर देण्याचा निर्णय झाला आहे. पाण्याच्या टँकरचं जीपीएसद्वारे ट्रॅकिंग होणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. तसेच १६ हजार बेकायदा कनेक्शन आम्ही तोडली आहेत. पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यास प्राधान्य आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारचे मोठे निर्णय
राज्यात आणखी ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर, आतापर्यंत ३०५ तालुके दुष्कळग्रस्त
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये अग्रीम मदत म्हणून देणार
मराठवाड्यात भूजल पातळी ३ मीटरने खालावली, पिण्याच्या पाण्याचे टँकर वाढवणार
१६ हजार अनधिकृत कनेक्शन कापले
शैक्षणिक फी माफीच्या जीआरमधून अटी-शर्ती हटवल्या
वीज बिलांसाठी कोणताही तकादा नाही, अतिउत्साह दाखवल्यास कारवाई
कर्जवसुलीसाठीही बँकांनी अतिउत्साह दाखवू नये, खासगी बँका, मायक्रो फायनान्स कंपन्यांशी चर्चा करणार
शेतकऱ्यांनी चारा किंवा चारा लागवड पीकं घ्यावीत, राज्य सरकार तो विकत घेणार
