Devendra Fadnavis On Hindi Language : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याच्या निर्णयावरून वाद सुरू आहे. केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक आराखड्यातील तरतुदींचा आधार घेत राज्यातील महायुती सरकारने १७ जून रोजी त्रिभाषा सूत्राचा शासन निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार राज्यातील मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांना इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवावी लागणार होती. मात्र, त्या निर्णयाला राज्यभरातून तीव्र विरोध झाल्यानंतर राज्य सरकारने तो मागे घेतला होता.

त्यानंतर राज्य सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या संदर्भात एका समितीची स्थापना केली होती. या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील भूमिका ठरवली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. दरम्यान, या हिंदी भाषा सक्तीच्या मुद्यांवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना पुन्हा एकदा मोठं भाष्य केलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषा सक्तीच्या मुद्यांवरून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीची केली जाणार का? या मुद्यांवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्वाचं भाष्य केलं. ‘आमच्या राज्यात सक्तीची फक्त मराठीच असेल’, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

हिंदी भाषा सक्तीच्या मुद्यांवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “१४ सप्टेंबर २०२१ रोजी या संदर्भातील अहवाल सादर झाल्यानंतर तो अहवाल २० जानेवारी २०२२ रोजी मंत्रिमंडळासमोर आला. आता त्या अहवालाचं इतिवृत्त मी या ठिकाणी घेऊन आलो आहे. डॉ. माशेलकर समितीच्या प्रस्तावित शिफारसींना मान्यता आणि त्या अहवालावर स्वाक्षरी कोणाची? ही स्वाक्षरी कोणाची हे फक्त आदित्य ठाकरे सांगतील”, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

“मुख्यमंत्री असताना मंत्र्यांचं काहीही अस्तित्व नसतं, म्हणजे इंग्रजी, हिंदी दुसरी भाषा पहिलीपासून लागू करावी असा अहवाल हा उद्धव ठाकरे यांच्या काळातील आहे. तेव्हाच्या मंत्रिमंडळाने काय स्वीकारलं? तर इंग्रजी, हिंदी दुसरी भाषा म्हणून पहिलीपासून ते १२ वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी, ही शिफारसी उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने स्वीकारली होती”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘राज्यात सक्तीची फक्त मराठीच…’

“त्यानंतर आमचं सरकार आलं आणि आमच्या अधिकाऱ्यांनी १ ते १२ वी पर्यंत सक्ती असा निर्णय कुठेही घेतला नाही. पण या अहवालाचा आधार घेऊन त्रिभाषा सूत्राचा जीआर काढला. त्यानंतर आमच्यावर मोठी टीका झाली. मला तर कधी-कधी आश्चर्य वाटतं. बर एवढंच नाही तर आमचे राज ठाकरे हे देखील त्यांच्याबरोबर (उद्धव ठाकरेंबरोबर) गेले. पण माझ्यामुळे दोन भाऊ एकत्रित आले याचा मला आनंद आहे. आता भाषा सक्ती बाबत पुन्हा एकदा सांगतो, आमच्या राज्यात सक्तीची फक्त मराठीच”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.