Devendra Fadnavis On MLA Sanjay Gaikwad : शिवसेनेचे (शिंदे) आमदार संजय गायकवाड हे कायम कोणत्या न कोणत्या कारणांवरून नेहमीच चर्चेत असतात. आता आमदार गायकवाड हे ‘शिवाजी कोण होता’ या गोविंद पानसरेंच्या पुस्तकावरून वादात सापडले आहेत. दिवगंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लील शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी संजय गायकवाड यांनी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर अखेर संजय गायकवाड यांनी माफी मागितली आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत मोठं भाष्य केलं आहे. ‘उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदार संजय गायकवाड यांना योग्य ती समज देतील’, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिलेल्या धमकीबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न विचारला. या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “असं आहे की आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. मात्र, त्या गोष्टी समजून न घेता आपण जेव्हा अकांडतांडव करतो तेव्हा ते योग्य नसतं. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत प्रत्येकाच्या मनात आदर आहे. आता ते पुस्तक प्रकाशित होऊन ४० वर्ष झालेली आहेत. मग ४० वर्षांनंतर अशा पद्धतीने एखादा वाद तयार करणं हे कितपत योग्य आहे? याचा विचार केला पाहिजे. विशेषतः अशा पद्धतीने शिवराळ भाषा वापरणं हे मला योग्य वाटत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांना (आमदार संजय गायकवाड) योग्य ती समज देतील.”

नेमकं वाद काय?

आमदार संजय गायकवाड हे ‘शिवाजी कोण होता’ या गोविंद पानसरेंच्या पुस्तकावरुन वादात सापडले आहेत. या पुस्तकाच्या नावावरून संजय गायकवाड यांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. आमदार गायकवाड यांनी केलेल्या कथित धमकीच्या फोन कॉलमुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला. आमदार गायकवाड यांच्या काही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत आमदार गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन केल्याचा आरोप असून या संभाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप करत शिवीगाळ केल्याचं आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत असल्याचा दावा करण्यात आलेला आहे.

Sanjay Gaikwad on Shivaji Kon Hota Book

प्रशांत आंबी यांनी काय प्रतिक्रिया दिली?

“१९८८ ला हे पुस्तक प्रकाशित झालं. मी त्यांना हेच सांगितलं की पुस्तक आधी त्यांनी वाचावं. ३८ वर्षे पुस्तक प्रकाशित आहे. संजय गायकवाड यांनी पुस्तक वाचलेलं नाही. मला जीभ कापतो, घरात घुसून मारतो वगैरे धमक्या दिल्या. आईवरुन आणि बायकोवरुन शिवीगाळ केली. राजारामपुरी पोलीस ठाण्यात मी संजय गायकवाड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे”, असं प्रशांत आंबी यांनी म्हटलं होतं.

आमदार संजय गायकवाड यांची दिलगिरी

गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपामुळे आमदार संजय गायकवाड अडचणीत आले होते. यावरून त्यांच्यावर राज्यभरातून टीका झाली. त्यानंतर अखेर शुक्रवारी आमदार संजय गायकवाड यांनी या प्रकरणात दिलगिरी व्यक्त केली. पण तरीही या पुस्तकाच्या (शिवाजी कोण होता? या) शीर्षकाबद्धलचा आपला आक्षेप कायम असल्याचंही आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.

विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटलं होतं?

बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे वास्तव चित्रण कॉ.गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता? या पुस्तकात केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशक तथा पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते प्रशांत आंबी यांना सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी “पानसरेंचे जे हाल केले, तसे हाल करू” अशी धमकी दिली. छत्रपती शिवरायांचे विचार जनमानसात रुजवण्यासाठी कॉ.गोविंद पानसरे यांनी संपूर्ण जीवन समर्पित केले. अशा महान विचारवंताचा धर्मांध शक्तींनी खून केला, त्यांच्या गुन्हेगारांना अजूनही शिक्षा झालेली नाही. असे असताना स्वतःला छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणवून घेणाऱ्या आमदाराने त्यांच्याच हत्येचा दाखला देत इतरांना धमक्या देणे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी लज्जास्पद आहे. धमकी देणाऱ्या आमदार विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतःच गृहमंत्री आहेत. त्यांनी सत्तेसाठी अशा निर्बुद्ध आमदारांना पाठीशी न घालता तात्काळ कठोर कारवाई करावी, तसेच सत्ताधारी आमदाराकडून जीवाला धोका असल्यामुळे प्रशांत आंबी यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी आमची मागणी आहे”, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं.

प्रकाश आंबेडकर यांनी काय म्हटलं होतं?

“कॉ.गोविंद पानसरे यांनी लिहिलेले ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक हे ‘कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, क्रांतीवीर छत्रपती’ ही शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा लोकांना समजू नये, असे आरएसएसला वाटते. आरएसएस छावणीतील हिंदुत्ववाद्यांनी स्वतःच्या सोयीची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकांसमोर मांडण्याचे षडयंत्र रचले होते, ते षडयंत्र उद्ध्वस्त करण्याचे काम ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाने केले आहे. “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाची चर्चा आयोजित करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा, तालुका आणि महानगर समित्यांना करण्यात येत आहे”, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं.