‘नॅक’ बाबत आजी-माजी मुख्यमंत्र्यांचे विभाग पिछाडीवर

महाविद्यालये नॅक मूल्यांकन करून घेण्याच्या बाबतीत पिछाडीवर असल्याचेही समोर आले आहे.

‘नॅक’ समितीकडून वरिष्ठ महाविद्यालयांचे मूल्यांकन करून न घेणाऱ्या प्राचार्य आणि संस्थाचालक यांच्याबाबतीत शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने कडक पवित्रा घेतला आहे. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विदर्भ व मराठवाडा विभागातील महाविद्यालये नॅक मूल्यांकन करून घेण्याच्या बाबतीत पिछाडीवर असल्याचेही समोर आले आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांच्या प्राचार्याची बठक अलीकडेच विद्यापीठात झाली. त्याआधी मुंबईमध्ये सर्व विद्यापीठांतील संबंधित अधिकाऱ्यांची एक बठक झाल्यानंतर शिक्षण सहसंचालकांच्या कार्यालयांनी नॅक मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकनाचा विषय हाती घेतला. अनुदानित वरिष्ठ महाविद्यालये या कार्यालयांच्या कार्यकक्षेत असून विनाअनुदानित महाविद्यालयांच्या नॅक मूल्यांकनाची बाब विद्यापीठातील महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाच्या कार्यकक्षेत आहेत.

राज्यातील नागपूर, अमरावती, नांदेड आणि औरंगाबाद या चार विभागांमध्ये अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांची संख्या दीड हजारांवर असून तेथील विनाअनुदानित महाविद्यालये ‘नॅक’चे मूल्यांकन करून घेण्याच्या बाबतीत चालढकल करीत असल्याची बाब मुंबई येथील बठकीत समोर आली.

विद्यापीठ अनुदान आयोगाने सुमारे एक तपापूर्वी सर्व महाविद्यालयांना ‘नॅक’ चे मूल्यांकन तसेच दर पाच वर्षांनी पुनर्मूल्यांकन अनिवार्य केले असून त्यानुसार महाविद्यालयांची वर्गवारी करण्यात येते. प्रत्येक महाविद्यालयातील भौतिक सुविधा, गुणवत्ता व अन्य बाबी नॅक समितीमार्फत तपासण्यात येतात.

नांदेड विभागात अनुदानित महाविद्यालयांची संख्या ९७ असून त्यातील ३१ महाविद्यालयांनी गेल्या १२ वर्षांत एकदाही नॅक मूल्यांकन करून घेतलेले नाही. ही प्रक्रिया करून घेण्याची जबाबदारी प्राचार्यावर आहे, असे नांदेड विभागाचे शिक्षण सहसंचालक डॉ. मोहन खताळ यांनी स्पष्ट केले. अशा महाविद्यालयांवर कारवाई करण्याचे आदेश नसले तरी, नजीकच्या काळात शासनाकडून कडक उपाय योजले जाण्याची शक्यता आहे.

वेगवेगळ्या विभागातील विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये तर अक्षरश: ‘आनंदी आनंद’ आहे. नांदेड विभागात अशा महाविद्यालयांची संख्या २९२ असून आतापर्यंत केवळ पाच महाविद्यालये ‘नॅक’ला सामोरे गेली आहेत. या पाश्र्वभूमीवर उर्वरित महाविद्यालयांना ‘नॅक’कडून मूल्यांकन करून घेण्याची जबाबदारी विद्यापीठाच्या संबंधित विभागावर आली आहे. नागपूर, अमरावती या विभागांतही अशीच स्थिती असून त्या विभागातील गोंडवाना विद्यापीठही अद्याप ‘नॅक’पासून दूर आहे.

नांदेडमधील यशवंत महाविद्यालयाने अलीकडेच तिसऱ्यांदा नॅक मूल्यांकन करून घेतले. अशा प्रकारचे हे विभागातील एकमेव महाविद्यालय आहे. विभागातील ज्या ३१ महाविद्यालयांनी अद्याप एकदाही नॅक मूल्यांकन करून घेतले नाही, त्यांना त्याबाबत अवगत केले जात असल्याचे डॉ. खताळ यांनी सांगितले.

अलीकडे विद्यापीठात झालेल्या बठकीला कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, शिक्षण संचालक धनराज माने, डॉ. खताळ व अन्य संबंधित अधिकारी हजर होते. या संदर्भातील पुढील बठक डॉ. खताळ यांच्या कार्यालयात १ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Devendra fadnavis on naac committee

ताज्या बातम्या