Devendra Fadnavis On Nashik Tapovan Tree Cutting Controvercy : कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीच्या विरोधात संपूर्ण राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नाशिकमधील तपोवन परिसरातील हजारो झाडे साधुग्रामसाठी तोडली जाणार असल्याचा दावा पर्यावरण प्रेमींनी केला आहे. महापालिकेच्या या प्रस्तावित निर्णयाला पर्यावरण प्रेमींनी मोठ्या प्रमाणात विरोध करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संदर्भात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील भूमिका मांडत वृक्षतोडीला विरोध केला आहे.
कुंभमेळ्यासाठी नाशिकमधील वृक्षतोडीवरून सुरू असलेल्या वादावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. कुंभमेळ्यासाठी ही प्रस्तावित वृक्षतोड रोखणार का? राज्य सरकारची नेमकी भूमिका काय आहे? याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘सकाळ संवाद’मध्ये बोलताना रोखठोक भूमिका मांडत ही जागा साधुग्रामची असल्याचं म्हटलं आहे. तसेच या वादावर एक मध्यम मार्ग काढणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी वृक्षतोडीच्या वादावर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, “खरं तर वृक्षतोड टाळलीच पाहिजे, याबाबत काही दुमत असण्याचं कारण नाही. फक्त त्याचं राजकीयकरण करणं हे चुकीचं आहे. साधुग्रामची ही जागा कित्येक वर्षांपासून आहे. आपण त्या ठिकाणी साधुग्राम तयार करत असतो. आपण जर २०१५, २०१६ चे तेथील गुगल इमेज पाहिले तर तेथे कोणतेही झाडे नव्हते”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले.
“२०१७-१८ मध्ये नाशिक महापालिकेने एक प्रस्ताव आणला की त्या ठिकाणी अतिक्रमण होत आहे, त्यामुळे आपण त्या ठिकाणी वृक्षरोपण केलं पाहिजे. तेव्हा राज्य सरकारची देखील ५० कोटी वृक्ष लागवडीची योजना सुरू होती. मग त्या अंतर्गत पण थोडा विचार न करता म्हणजे ती जागा आपल्याला परत १२ वर्षांनी वापरावी लागते याचा विचार न करता त्या ठिकाणी झाडे लावण्यात आले. ते झाडे आता मोठे झालेले आहेत. त्यामुळे लोकांनाही वाटतं की या ठिकाणी एवढे मोठे वृक्ष आहेत आणि तुम्ही ते कसे तोडता? आता प्रशासनासमोर देखील हा प्रश्न आहे की जर ते झाडे तोडले नाही तर साधुग्राम कुठे करायचं?”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नाशिकमधील वृक्षतोडीच्या वादावर मार्ग काढणार?
“आपण पाहिलं की उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये जो कुंभमेळा होतो तो १५ हजार हेक्टरमध्ये होतो आणि आपल्याला कुंभमेळा फक्त ३५० एकरमध्ये करायचा आहे. मग असं असताना जर तेथील जमीन मिळाली नाही तर मग हा कुंभमेळा कसा होईल? आपल्या सनातन संस्कृतीमध्ये वृक्ष, पर्यावरण, नदी, याला एक विशेष महत्व आहे. आपण नदीची आराधना करणारे लोक आहोत. त्यामुळे लोकांचा हा देखील समज आहे की कुंभमेळा करता आणि वृक्ष कसे तोडता? लोकांना असं वाटणं हे योग्य आहे. त्यामुळे या वादामध्ये आपल्याला एक मधला मार्ग काढावा लागेल. ती जागा देखील आपल्याला वाचवता येईल आणि जेवढे वृक्ष वाचवता येतील तेवढे वाचवले पाहिजेत. काही वृक्ष ट्रान्सप्लांट करण्याची गरज असेल तर ते देखील केलं पाहिजे. मी प्रशासनाची जी काही चर्चा केली त्यानुसार, प्रशासनाचं असं मत आहे की कुंभमेळाही झाला पाहिजे आणि आपल्याला झाडेही जास्तीत जास्त कशा पद्धतीने वाचवता येतील याचा प्रयत्न केला पाहिजे. पण यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
