Devendra Fadnavis On Rahul Gandhi : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये घोळ झाल्याचा आरोप करत आहेत. राहुल गांधी यांनी या संदर्भात आतापर्यंत अनेकदा भाष्य करत वेगवेगळ्या अहवालांचा दाखला देत मतदानाच्या दिवशी शेवटच्या काही तासांत मतदानाची आकडेवारी वाढल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. यानंतर आता राहुल गांधींनी आणखी एक दावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात पाच महिन्यांत अचानक आठ टक्के मतदार वाढल्याचा दावा केला आहे.

तसेच मतदानाच्या दिवशी अनेक बूथवर अचानक २० ते ५० टक्के मतदार वाढल्याचं निदर्शनास आल्याचा आरोपही त्यांनी केला. या आरोपाला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. ‘ झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो…’, असं म्हणत तुम्ही कधीपर्यंत हवेत बाण सोडत राहणार?, असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. तसेच मतदानाच्या टक्क्यात वाढ झाल्यामुळे काँग्रेसचे कोणते उमेदवार निवडून आले? याची माहिती देखील त्यांनी ट्विटमध्ये दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं?

“झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो…, राहुल गांधी, महाराष्ट्रातील मोठ्या पराभवामुळे तुमचं दुःख दिवसेंदिवस वाढत आहे, हे मी मान्य करतो. पण तुम्ही कधीपर्यंत हवेत बाण सोडत राहणार आहात? पण तुमच्या माहितीसाठी महाराष्ट्रात २५ पेक्षा जास्त मतदारसंघ आहेत, जिथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ८ टक्क्यांपेक्षा जास्त मतदार वाढले आहेत आणि काँग्रेसने अनेक ठिकाणी विजय मिळवला आहे. माझ्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघाला लागून असलेल्या पश्चिम नागपूर मतदारसंघात ७ टक्के मतदारांची (२७,०६५) वाढ झाली आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी तेथे निवडणूक जिंकली आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

“उत्तर नागपुरात मतदारांमध्ये ७ टक्के (२९,३४८) वाढ झाली आणि काँग्रेसचे नितीन राऊत विजयी झाले. पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी येथे १० टक्के (५०,९११) मतदारांची वाढ झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे विजयी झाले. मालाड पश्चिममध्ये ११ टक्के (३८,६२५) मतदारांची वाढ झाली आणि तुमच्या काँग्रेस पक्षाचे अस्लम शेख विजयी झाले. मुंब्रामध्ये मतदारांमध्ये ९ टक्के (४६,०४१) वाढ झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड विजयी झाले”, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“मित्रपक्षांबरोबर नाही तर त्यांनी या ट्विटपूर्वी एकदा त्यांच्याच पक्षातील अस्लम शेख, विकास ठाकरे, नितीन राऊत यांसारख्या नेत्यांशी बोलले असते तर बरं झालं असतं. किमान काँग्रेसमधील संवादाचा अभाव इतका वाईटरित्या प्रदर्शित झाला नसता”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

राहुल गांधी यांनी काय आरोप केले होते?

राहुल गांधी यांनी दावा केला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातही मतदानाच्या आधी शेवटच्या पाच महिन्यांत अचानक आठ टक्के मतदार वाढले होते. मतदानाच्या दिवशी अनेक बूथवर अचानक २० ते ५० टक्के मतदार वाढल्याचं निदर्शनास आल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे. राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी न्यूजलॉन्ड्री या संकेतस्थळावरील माहिती शेअर करत म्हटलं आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात (दक्षिण-मध्य नागपूर) शेवटच्या पाच महिन्यांमध्ये आठ टक्के मतदार वाढले आहेत, तर, काही बूथवर २० ते ५० टक्के मतदार वाढले, असा दावा त्यांनी केला आहे.