राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास महिन्याभराने मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे. आज झालेल्या शपथविधी समारंभात भाजपाचे ९ तर एकनाथ शिंदे गटाच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, आता मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मंत्र्यांच्या नावांवरून जोरदार चर्चा सुरू झाली असून सर्वाधिक आक्षेप संजय राठोड यांच्या समावेशावर घेतला जात आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून संजय राठोडांवर प्रचंड टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपा सरकारमध्ये त्यांचा मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात आता देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते असताना संजय राठोड प्रकरणावरून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेली टीका व्हायरल होऊ लागली आहे.

चित्रा वाघ यांनीही घेतला आक्षेप

संजय राठोड यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. “पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे,” असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे. तसेच, “संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे,” असंही चित्रा वाघ यांनी म्हटलंय. त्यांनी या ट्विटमध्ये ‘लडेंगे… जितेंगे’ असं म्हणत मुख्यमंत्री कार्यलायच्या ट्विटर हॅण्डलला टॅग केलं आहे.

narendra modi uddhav thackeray (2)
मोदींनी उद्धव ठाकरेंना पुन्हा साद घातलेली? संजय राऊत म्हणाले, “दिल्लीतल्या त्या बैठकीत पंतप्रधानांनी…”
baramati mp supriya sule talk regarding anonymous letter on social media
निनावी पत्राबाबत माहिती नाही! सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण
jayant patil and ajit pawar
अर्थसंकल्पातील तरतुदींवरून जयंत पाटील आक्रमक; सत्ताधाऱ्यांना उद्देशून म्हणाले, “बाटाचा बूट…”
sushma andhare
कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांंच्या समोर लढणे आम्हाला मोठे आव्हान वाटतच नाही; उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे मत

चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून संजय राठोड आणि तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारवर तीव्र आगपाखड केली होती. मात्र, एकीकडे त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली असताना आता देवेंद्र फडणवीसांनी कधीकाळी उद्धव ठाकरेंवर या प्रकरणावरून केलेल्या टीकेचे व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. यामध्ये संजय राठोडांच्या राजीनाम्याची मागणी करतानात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना जाब विचारला होता.

काय म्हणाले होते फडणवीस?

सर्व पुरावे असतानाही काही घडलंच नाही, असं दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत असल्याचा आरोप फडणवीसांनी १ मार्च २०२१ रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता. “पूजा चव्हाण प्रकरणावरून कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांची जी केविलवाणी स्थिती झाली, ती होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. सर्व पुरावे असतानाही धडधडीत खोटं बोलत काही घडलंच नाही, असं दाखवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न पत्रकार परिषदेत मास्कमधून देखील दिसत होता. मुख्यमंत्र्यांनी फक्त एवढंच सांगावं, की बाहेर आलेल्या ऑडिओ क्लिप्स खऱ्या आहेत की खोट्या? यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडलं ते खरं की खोटं? माध्यमांनी जे काही बाहेर काढलंय, ते खरं की खोटं? पण एवढं झाल्यावरही जर कोणाला साधूसंत ठरवायचंच असेल, तर जरूर त्यांनी ठरवावं. यातून तुमची नैतिकता काय आहे हे जनतेसमोर येतं”, असं फडणवीस म्हणाले होते.

Pooja Chavan Case : “मुख्यमंत्र्यांनी फक्त एवढंच सांगावं…”, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना परखड सवाल!

दरम्यान, एकीकडे देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेची आठवण केली जात असताना दुसरीकडे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सुद्धा या प्रकरणी केलेल्या टीकेचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. १३ फेब्रुवारी २०२१ रोजी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून जारी केलेल्या व्हिडीओमध्ये किरीट सोमय्या संजय राठोडांच्या अटकेची मागणी करत आहेत. “संजय राठोडांची हकालपट्टी नाही, तर अटक व्हायला हवी. पूजा चव्हाणची आत्महत्या नसून हत्या आहे. संजय राठोड यासाठी जबाबदार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासाठी शरद पवारांच्या आदेशाची वाट पाहात आहेत का?” असा सवाल किरीट सोमय्या या व्हिडीओमध्ये करत आहेत.

दरम्यान, संजय राठोड यांच्या समावेशामुळे राज्य सरकारवर विरोधकांकडून तीव्र शब्दांत टीका केली जात आहे.