Devendra Fadnavis On Sanjay Raut : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आज शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. ‘आम्ही आजही मुंबई १० मिनिटांत बंद पाडू शकतो’, असं विधान संजय राऊत यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘बाळासाहेब ठाकरे यांच्या एका इशाऱ्यावर दोन तासात मुंबई बंद होऊ शकत होती. मात्र, आता मुंबई १० मिनिटांत बंद पाडण्याची यांच्यात कोणात दम नाही’, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. ते एनडीटीव्हीच्या कार्यक्रमात बोलत होते.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आम्ही अशा पोकळ धमक्यांना घाबरणारे लोक नाहीत, हे लक्षात घ्या. जर तुमची (उद्धव ठाकरे यांची) ताकद एवढीच होती तर तुम्हीच आव्हान दिलं होतं की, जेव्हा एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले होते, तेव्हा ते मुंबईत येतील तेव्हा त्यांना मुंबईत एन्ट्री करू देणार नाहीत, शिंदे मुंबईत पाऊल ठेऊ शकणार नाहीत. मुंबईत ते पुढे जाऊ शकणार नाहीत, असं आव्हान त्यांनी दिलं होतं. मात्र, तरीही शिंदे मुंबईत आले, ५० आमदारांबरोबर आले, याच मुंबईच्या रस्त्यांवरून शिंदे आणि आम्ही राजभवनात गेलो. त्यानंतर आम्ही सरकार स्थापन केलं”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“मुंबई बंद करणं तर सोडा, ते (संजय राऊत) त्यांच्या घराभोवतीचा परिसरही बंद करू शकले नाहीत. त्यामुळे हे सगळं फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. मात्र, जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हा शिवसेनेची ताकद होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या एका इशाऱ्यावर दोन तासात मुंबई बंद होऊ शकत होती. मात्र, आता यांच्यात कोणात दम नाही. संजय राऊत दिवसभर अशा पद्धतीचं फक्त बोलत असतात”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांचं वक्तव्य काय?
मुंबई पालिका हातातून गेली तर शिवसेनेचं (उद्धव ठाकरे) राजकीय भविष्य संपेल असं वाटतं का? यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “ठाकरे कधीच हद्दपार होणार नाहीत. आम्ही खूप निवडणुका हरलो आहोत, आम्ही खूप कमी निवडणुका जिंकलो आहोत. निवडणुकीत हार-जीत होत असते. आमचं संघटन मजबूत आहे. आजही आम्ही १० मिनिटांत मुंबई बंद करू शकतो. ही आमची सर्वांत मोठी अचिव्हमेंट आहे. “ठाकरे वाचले तर मराठी माणूस आणि मुंबई वाचेल. हे सर्वांना माहीत आहे. हे देवेंद्र फडणवीसांनाही माहीत आहे, विनोद तावडेंनाही माहिती आहे”, असं संजय राऊतांनी एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं होतं.
