Satara ZP Election Politics : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकी दरम्यान झालेल्या वादाची मोठी चर्चा सुरू आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

या सगळ्या घडामोडींबाबत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना सविस्तर माहिती देत घटनाक्रम सांगत कारवाईची मागणी केली. दरम्यान, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या वादाचे विधानसभेत पडसाद उमटले आहेत. सातारा पोलीसांच्या विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदे सेनेच्या आमदारांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली. यानंतर सभागृहात बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी भाष्य करत चौकशी करून कारवाईचे आश्वासन देत एका वाक्यात विषय संपवला.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“साताऱ्यातील जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान घडलेल्या घटनेचा मी देखील साक्षीदार आहे. कारण जेव्हा निवडणूक प्रक्रियेची तारीख जाहीर झाली, तेव्हा मला मंत्री शंभूराज देसाई यांनी फोन केला होता. मकरंद पाटील देखील तेव्हा तिकडे होते. तेव्हा ते म्हणाले की दोन मतदार आहेत, त्यांच्यावर कधी पाच वर्षांपूर्वीचा गुन्हा निवडणुकीच्या आधी दोन दिवस दाखल झाला आहे. त्यानंतर सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना मी फोन केला आणि म्हटलं की काय प्रकार आहे? तेव्हा ते म्हणाले की गुन्हा दाखल झालेला आहे. पण आपण त्यावर कारवाई नंतर करू. तेव्हा मी त्यांना एक सांगितलं की मतदान आहे. मतदानापासून कोणालाही वंचित ठेवता येत नाही”, असं शिंदे सभागृहात बोलताना म्हणाले.

“मतदानापासून कोणलाही वंचित ठेऊ नका. त्यानंतर मला पोलीस अधीक्षक म्हणाले की असं काहीही होणार नाही. त्यानंतर मी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना फोन केला आणि सांगितलं की साताऱ्यात अशी एक निवडणूक आहे. मला थोडी शंका आहे. तेथील दोन मतदार आहेत. कारण बहुमत मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्या गटाकडे होतं. पण बहुमत कमी करण्यासाठी आणि विजय मिळवण्यासाठी असा काही प्रकार होऊ शकतो. त्यानंतर पोलीस महासंचालकांनी साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांना फोन केला. त्यानंतर तुषार दोशी यांच्याकडे खात्री देखील केली. तेव्हा ते मला म्हणाले की हो मला पोलीस महासंचालकांचा फोन आला. तेव्हा ते मला म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत त्या लोकांना मतदानापासून थांबवलं जाणार नाही. तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्हाला जी काही कार्यवाही करायची ती करा. पण मतदानानंतर करा. मात्र, अशा प्रकारे मतदानापासून एखाद्याला वंचित ठेवणं हा लोकशाहीचा खून आहे”, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

“दोनच मतदार कशामुळे पकडले? तेव्हा मी डीजींना पुन्हा फोन केला आणि सांगितलं की निवडणूक पार पडत आहे. निवडणूक पार पडल्यानंतर तुम्ही त्या मतदारांना सोडल्यानंतर काय उपयोग? तेव्हाही मला डीजींनी सांगितलं की असं काहीही होणार नाही. मात्र, तरीही जी परिस्थिती निर्माण झाली, अशा प्रकारची परिस्थिती आपण महाराष्ट्रात कधीही पाहिलेली नाही. कारण अशा प्रकारे कुणाला मतदानापासून वंचित ठेवणं हे इतिहासात पहिल्यांदा असं घडलं आहे”, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी वस्तुस्थिती सांगितली. त्या वस्तुस्थितीच्या आधारे या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल. चौकशीमध्ये जे काय समोर येईल, त्यानुसार या प्रकरणात कारवाई केली जाईल”, असं सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका वाक्यात विषय संपवला.