devendra fadnavis on sunetra pawar to become maharashtra deputy cm : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत अकाली निधन झाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेतपद रिक्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची या पदावर निवड करण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या संपूर्ण राजकीय घडामोडींवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कुठलाही निर्णय जो घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल. राष्ट्रवादी पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून उभे राहू. त्यामुळे अजितदादांचे कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत. त्यांचे जे काही निर्णय होतील, त्यांना योग्य ते समर्थन आमच्याकडून असेल,” अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री पदासाठीच्या नावाचा काही प्रस्ताव आला आहे का? असे फडणवीसांना विचारण्यात आले. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “माझ्याशी दोन वेळा चर्चा करून ते गेले आहेत. \त्यांनी त्यांची कार्यपद्धती आणि काय पर्याय आहेत याबाबत चर्चा केली आहे. मात्र अंतिम निर्णय हा त्यांचा पक्ष घेईल, त्यामुळे त्यासंदर्भात मी बोलणे योग्य होणार नाही,” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी, उद्याच होणार शपथविधी
समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवड करण्यासाठी उद्या, शनिवारी आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाईल. त्यानंतर पवार यांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांचा राज्य मंत्रिमंडळात लगेचच समावेश करण्यात येणार आहे. हा शपथविधीचा समारंभ अत्यंत साधेपणाने पार पाडला जाईल. सायंकाळी ५ वाजता शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता आहे.

