Devendra Fadnavis Parliament Morcha statement reaction : दिल्लीतील आंदोलनात मोठा हिंसाचार उफाळून आल्यानंतर देशभर याची मोठी चर्चा झाली. हजारो तरुण या आंदोलनात सहभागी झाले होते. परंतु, या आंदोलनात काहीजण अजेंडा घेऊन आले होते, असाही दावा करण्यात येतोय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या आंदोलनावर टीका केली. ते आज माध्यमांशी बोलत होते.
राजकीय अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, “लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. लोकशाहीत आंदोलन करताना संविधानाने दिलेले हक्क आणि टाकलेली जबाबदारी लक्षात घेतली पाहिजे. कोणीही परवानगी घेऊन शांततेत आंदोलन करत असेल, तर अशा आंदोलनाला परवानगीही दिली जाईल आणि असे आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. जाणीवपूर्वक राजकीय अशांतता निर्माण करण्याकरता आंदोलने करणं, हिंसा करणं हे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही. त्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल.”
नेतृत्त्वहीन व्यवस्था पाहायला मिळाली
“कोणतंही आंदोलन हे फेसलेस असतं तेव्हा काही प्रवृत्ती त्या आंदोलनात शिरत असतात. या प्रवृत्ती आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून, आपला स्वार्थ कसा पूर्ण करता येतील, असा प्रयत्न करत असतात”, असं फडणवीस म्हणाले. “अनेक राजकीय पक्ष आपली पोळी कशी भाजता येईल, याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या संघटना ज्यांचा या विषयाशी घेणं देणं नाहीय, तेही येथे आंदोलन करून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेव्हा फेसलेस आंदोलन असतं, तेव्हा नेतृत्त्वहीन व्यवस्था पाहायला मिळते”, अशी टीकाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
पोलिसांनी मोठा संयम दाखवला
ते पुढे म्हणाले, “पोलिसांच्या गाड्या फोडणं, गाड्या उलटवणं, दगडफेक अशा गोष्टी घडल्या. कोणत्याही सरकारला आपल्या नागरिकांवर लाठीचार्ज करणं आवडत नाही. पण काल आपण पाहिलं असेल की ज्या प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होती, जर पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता तर अनेक अनावश्यक अशा गोष्टी तिथे घडल्या असत्या. पोलिसांनी मोठा संयम दाखवला आहे. अशा प्रकारचं आंदोलन योग्य पद्धतीने व्हावं, या पुरती जेवढी कारवाई व्हावी तेवढी त्यांनी केली”, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं.
आपला स्वार्थ साधण्याकरता काही जण आंदोलनात शिरले
“याच्या खोलात गेलो तर सर्व आंदोलकांवर आरोप करू इच्छित नाही. काही लोक चांगल्या भावनेने आंदोलन करत असतील, पण त्यात असेही लोक घुसलेले आहेत की, ज्यांना आपला स्वार्थ साधायचा आहे, ज्यांना या नीटशी काही देणंघेणं नाहीय, त्यांना केवळ अराजकता निर्माण करायची आहे”, असा आरोपही त्यांनी केला.
“आंदोलन करणारे काही लोक चांगल्या भावनेने असू शकतात, पण काहीजण आपला अजेंडा घेऊन शिरलेले आहेत. त्यातील अनेकांना नीट काय, परीक्षा कधी झाली हेही माहिती नाही, ते आपआपला अजेंडा सांगून राहिले आहेत. याचा अर्थ असा आहे की एका दिशेने चालणारे, एका विचाराने चालणारे आलेले नाहीत. काही राजकीय पक्ष ज्यांना त्या त्या राज्यात रिजेक्ट केलेले आहेत, असे पक्ष यातून आपल्याला काही मिळवता येईल का, असा प्रयत्न करत आहेत”, असंही ते म्हणाले.
