मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची वार्षिक सर्वसाधारण सभा सह्याद्री अतिथीगृहात पार पडली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे आदी उपस्थित होते. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मांडलेल्या प्राधिकरणाच्या ४ हजार ६२८ कोटींच्या अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली.

पुणे महानगर विकास प्रदेश प्राधिकरणाने(पीएमआरडीए) संरचनात्मक (स्ट्रक्चरल) आराखडा तयार करताना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी. तसेच येत्या सहा महिन्यात हा आराखडा तयार करावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

फडणवीस यांनी कात्रज-येरवडा दुहेरी बोगद्याच्या कामासाठी स्वतंत्र विशेष उद्देश वहन संस्था निर्माण करावी. त्यासाठी पुणे महापालिकेने पुढाकार घ्यावा. तसेच पीएमआरडी व पुणे महापालिकेने संयुक्तपणे कार्यवाही करावी असे आदेश दिले. तसेच पुणे महापालिकेमध्ये गेलेल्या २३ गावांचा विकास आराखडा तयार करावा. तत्पूर्वी तेथे प्रथम संरचनात्मक आराखडा तयार करावा, असेही त्यांनी सांगितले.

नागरिकांना वेळेत आणि जलद गतीने सेवा देता यावी यासाठी जमीन विल्हेवाटीच्या दैनंदिन कामकाजाचे अधिकार थेट महानगर आयुक्तांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत मंजूर करण्यात आला. अर्थसंकल्पात पुणे महानगर क्षेत्रातील रिंग रोड, मेट्रो प्रकल्प, रस्ते विकास, कात्रज–येरवडा ट्विन टनेल, लोणावळा स्कायवॉक या कामांना गती मिळणार आहे.