Devendra Fadnavis US Ambassador Praise statement : जगाच्या नकाशावर महाराष्ट्र दोन गोष्टींमुळे आहे. पहिली गोष्ट म्हणजे मुंबई आणि दुसरी म्हणजे या राज्याचे अद्वितीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अशा शब्दांत अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी कौतुक केलं. ते मुंबईतील कार्यक्रमात बोलत होते.

मेडिसिटीसाठी अमेरिकेच्या क्लिव्हलँड क्लिनिकसोबत महाराष्ट्र शासनाचा करार झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्जियो गोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. हे कौतुक आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. राज्यातील विविध क्षेत्रातील संधीचा लाभ घेत अमेरिकेतील गुंतवणूकदारांनी आपल्या कल्पना, संशोधन घेऊन महाराष्ट्रात यावे. महाराष्ट्र शासन त्यांना येथील बाजारपेठ, पायाभूत सुविधा, कौशल्ययुक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देईल. त्यामुळे त्यांनी राज्यात गुंतवणूक करावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर म्हणाले, भारत आणि अमेरिकेतील संबंध दृढ आहेत. भविष्यातील आव्हानांचा विचार करता दोन्ही देशातील भागीदारी महत्त्वाची ठरणार आहे. पुढील काळात दोन्ही देशांना आर्थिक संबंध वाढविण्यावर भर द्यावा लागणार आहे. अमेरिकेचा दूतावास प्रत्येकासाठी सदैव उघडे आहे. मुंबईतील कौन्सिलेट्स जगभरातील बहुतांश दूतावासांपेक्षा मोठे आहे. जगात इतर कोणतेही दोन देश अमेरिका आणि भारतासारखे जागतिक आर्थिक वाढीला गती देण्यासाठी सक्षम स्थितीत नाहीत. त्यामुळे दोन्ही देश भागीदारीतून हे कार्य करू शकतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर विश्वास आहे आणि त्यांनी पहिल्या दिवसापासून या संबंधांमध्ये मोठे योगदान दिले आहे. दुसऱ्या कार्यकाळाच्या अवघ्या काही आठवड्यांतच, त्यांनी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका पुढाकाराची सुरुवात केली, ज्याने या संबंधांमध्ये कायापालट घडवून आणला आहे, असेही राजदूत गोर म्हणाले.

देवेंद्र फडणवीस विलक्षण मुख्यमंत्री

“मला ज्यांना पाहून आनंद होत आहे, ते माझे मित्र आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मला एक गोष्ट सांगायची आहे, मी जगभर फिरलो आहे, अनेक नेत्यांना भेटलो आहे. तुमच्याकडे एक असा माणूस आहे, जो विलक्षण आहे, प्रचंड ऊर्जा असलेला आहे आणि ज्याला आपल्या कामाबद्दल आस्था आहे. आजघडीला महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर आहे. एक म्हणजे मुंबई दुसरं म्हणजे तुमचे विलक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, असे सर्जिओ गोर यांनी म्हटले.