Devendra fadnavis reaction on india us trade deal : अमेरिकेने भारतातून आयात होणार्‍या मालावरील टॅरिफमध्ये कपात करत ते १८ टक्के केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. ट्रम्प यांनी असेही स्पष्ट केले आहे की, भारत आणि अमेरिका यांच्यामधील व्यापार करारावर एकमत झाले आहे. मात्र पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या एक्स पोस्टमध्ये या ‘ट्रेड डील’बद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान या घोषणनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत भारत आणि अमेरिकेतील या व्यापार कराराला ऐतिहासिक म्हटले आहे. हा मैत्रिचा नवा अध्याय असल्याचेही फडणवीस म्हणाले आहेत.

“मैत्रीचा एक नवीन अध्याय! भारत आणि अमेरिकेमधील ऐतिहासिक व्यापार करार हा खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय आहे. जागतिक व्यापारासाठी सुद्धा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण आहे,” अशा शब्दात फडणवीसांनी या व्यापार कराराचे वर्णन केले आहे.

या कराराचा आणि कपात करण्यात आलेल्या टॅरिफचा देशातील व्यावसायिकांना फायदा होईल असेही फडणवीसांनी नमूद केले आहे. ते पुढे म्हणाले की, “जगातील प्रमुख निर्यात करणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताला आता अमेरिकेकडून प्राधान्य टॅरिफ दर मिळणार आहे. यातून भारत-अमेरिका मैत्रीच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे. हा करार भारतीय व्यावसायिकांसाठी अनेक नूतन आणि उत्साहवर्धक संधींचे द्वार खुले करेल आणि ही दोन्ही देशांसाठी फायदेशीर अशी बाब ठरेल.”

या करारारामुळे देशासह निर्यातीत अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राला देखील फायदा होईल असे फडणवीसांनी नमूद केले आहे. “महाराष्ट्र हे कायम निर्यातीत अग्रेसर असलेले राज्य आहे. त्यामुळे हा करार आपल्या राज्यातील व्यवसायासाठी नवे क्षितिज खुले करेल. डेटा सेंटर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्रांतिकारी आधुनिक तंत्रज्ञानामध्ये महाराष्ट्राला मोठी गुंतवणूक प्राप्त होईल,” असे फडणवीसांनी म्हटले आहे.