scorecardresearch

…त्यामुळे २०२४ मध्ये ‘ही’ जागा आम्ही १०० टक्के जिंकणार – देवेंद्र फडणवीसांचं विधान!

कोल्हापूर पोटनिवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर दिली आहे प्रतिक्रिया

(संग्रहीत छायाचित्र)

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीमध्ये भाजपाला पराभूत करत महाविकास आघाडीने विजय मिळवला. या निवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम यांचा १९ हजार ३०७ मताधिक्याने पराभव केला. काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे कोल्हापूरला पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत जाधव यांना ९७,३३२ तर कदम यांना ७८,०२५ मते मिळाली. भाजपाच्या या पराभवानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“आम्हाला मिळालेल्या मतांवर आम्ही समाधानी आहोत, अतिशय मोठ्याप्रमाणात आमच्याकडे मतदार वळलेला आहे. आम्ही वारंवार जे सांगत होतो की ही जी पोकळी आहे ती आम्ही भरून काढत आहोत. ती काल केल्याचं दिसलेलं आहे, कारण एकटे लढलो तरी जेव्हा भाजपा आणि शिवसेना एकत्र लढलो होतो त्यापेक्षा जास्त मतं आहेत. ते तिघं लढले तरी त्यांची मतं वाढलेली नाही. आताचे मत हे सहानुभूतीचं मत आहे. त्यामुळे २०२४ मध्ये आता ही जागा आम्ही १०० टक्के जिंकणार या बद्दल माझ्या मनात खात्री आहे.” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर प्रतिक्रिया –

तसेच, मनसे प्रमुख राज ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. याशिवाय, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा देखील अयोध्या दौरा लवकरच असणार आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले की, “अयोध्येचा दौरा हा कोणीही करायला हरकत नाही, कारण प्रभू श्रीराम हे आपलं दैवत आहे आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी जर कोणी जाणार असेल, तर त्याचं स्वागतच आहे. आम्ही देखील त्या ठिकाणी जात असतो आणि मला असं वाटतं की कुठल्याही व्यक्तीला तिथे जावसं वाटणं यामध्ये काही गैर नाही. कारण, प्रभू श्रीरामांचं इतकं मोठं मंदिर हे त्या ठिकाणी होतंय, त्याची भव्यता पाहण्याची इच्छा आणि प्रभू श्रीरामाची दर्शन घेण्याची इच्छा ही स्वाभाविक आहे.”

संजय राऊत यांच्या टीकेवर प्रतिक्रिया –

याचबरोबर, महाराष्ट्रात दंगील घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपा निशाणा साधला, शिवाय अन्य मुद्य्यावरून देखील टीका केली आहे. यावर बोलताना फडणवीस यांनी, “संजय राऊत हे निराश व्यक्ती आहेत. ते दिवसभरात काहीही बोलत असतात, कितीवेळा आम्ही उत्तरं द्यायची. आम्हाला कामधंदे आहेत, त्यांना नाहीत.” अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis reaction on kolhapur north assembly by election result msr

ताज्या बातम्या