महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विविध प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यामागे गृहमंत्री अनिल देशमुख होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, परमबीर सिंह यांनी लावलेले आरोप सत्य असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा – “शरद पवार, उद्धव ठाकरेंसारखी मंडळी…”, राज ठाकरेंचा थेट हल्लाबोल; बीडमधील ‘त्या’ प्रकाराबाबत केला गंभीर आरोप!

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

परमबीर सिंह यांनी मला आणि भाजपाच्या नेत्यांना अटक करण्यासंदर्भात जो दावा केला आहे. तो खरा आहे. असा प्रयत्न त्यावेळी झाला होता. त्यांनी फक्त एकच घटना सांगितली आहे. मात्र, मला अटक करण्याचा प्रयत्न एकदा नाही, तर चार वेळा झाला. खोट्या केस करून मला कशी अटक करता येईल, याचं षडयंत्र झालं, पण त्यावेळी आम्ही त्याचा खुलासा करू शकतो. त्याचे पुरावे आम्ही सीबीआयला दिले, त्याचे पुरावे आजही आमच्याकडे आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, की महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये माझ्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्याची सुपारी काही पोलीस अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यांनी ती सुपारी घेतली देखील होती. पण त्यांना यश मिळालं नाही. कारण काही चांगल्या अधिकाऱ्यांनी असे खोटे गुन्हे दाखल करण्यास नकार दिला, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.