उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधून फुटून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी आज (२५ जून) पत्रकारांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केल्याच्या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. संजय दिना पाटलांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केल्याच्या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात संजय दिना पाटील यांना दिलगिरी व्यक्त करण्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे, अशी माहिती शिंदे यांनीच माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, या घटनेवर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“मी प्रवासात असल्यामुळे मला या प्रकरणाची काही माहिती नाही. त्यामुळे या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊनच त्यावर बोलणं योग्य होईल. नेमकं काय घडलं? याची माहिती मी घेतो. मी आताच नागपूरवरून आलो आहे. मात्र, कोणालाही कोणीही अशा प्रकारची धमकी देणं योग्य नाही”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली?

“मी आताच खासदार संजय दिना पाटील यांच्याशी बोललो. त्यांनी माझ्याकडे भावना व्यक्त केल्या आहेत की, पत्रकारांबद्दल चुकीचं वक्तव्य करण्याची माझी कोणतीही भावना नव्हती. माझे आणि पत्रकारांचे संबंध चांगले आहेत. पत्रकारांच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, असं मला संजय दिना पाटील यांनी सांगितलं”, असं स्पष्टीकरण देत एकनाथ शिंदे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

दिलगिरी व्यक्त करण्याचा शिंदेंचा संजय दिना पाटलांना सल्ला

“जे (संजय राऊत) दररोज त्यांच्या विरोधात बोलतात, रोज त्यांच्याबाबत अपशब्द बोलतात. तोडून टाका, मारून टाका, तुडवा, अशा पद्धतीने खालच्या दर्जाचे जे शब्द वापरतात, मग तो देखील मीडियाचा अपमान आहे. किती दिवसांपासून काय-काय बोलतात ते आपण पाहिलं. याचाच राग संजय दिना पाटील यांच्या मानामध्ये आहे. मात्र, पत्रकारांच्या बाबतीत संजय दिना पाटील यांच्या मनामध्ये कुठलाही राग नव्हता. पत्रकारांच्या बाबतीत अशा प्रकारचं वक्तव्य कोणत्याही लोकप्रतिनिधीने करू नये. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुमच्याकडून जर पत्रकारांना काही शब्द गेले असतील तर पत्रकारांशी बोलून दिलगिरी व्यक्त करावी”, असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी संजय दिना पाटील यांना दिला आहे.

संजय दिना पाटलांनी नेमकं काय म्हटलं होतं?

“रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे, कमिशनरकडे जाऊन तक्रार करा. तुमची इज्जत करतोय, तुम्हाला सहन करतोय, खूप दिवस सहन केलं. मग अजून कशाला गां## घुसताय. अरे कोणत्याही गोष्टीची लिमिट असते. सांगितलं ना सर्व. त्याने काही बोलूदे. तुझ्या आ## ### गेलं, आणि आता माझ्याकडे येऊ नका. माझ्याकडे काही घ्यायला आला तर मारणार. रेकॉर्ड करा आणि सांगा. तुम्ही आता मला विचारायला आलात तर मार खाणार”, अशा भाषेत खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.