scorecardresearch

“भाजपाला गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं”, देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर; म्हणाले, “नाकाखालून ४० आमदार गेल्याचा…”

भाजपा गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी खोचक टीका केली होती.

devendra fadnavis reaction on uddhav thackeray,
फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

केंद्रीय निवडणूक आयोगानं ‘शिवसेना’ पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. तसेच भाजपा गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं, असं म्हणत खोचक टोलाही लगावला. दरम्यान, ठाकरेंच्या या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – “जीभ हासडून टाकू” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “रोज उठसूट…”

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“उद्धव ठाकरेंच्या भाषणात तेच शब्द, तीच वाक्य, तीच टीका, तेच टोमणे बघायला मिळाले. याशिवाय त्यांच्या भाषणात नवीन काहीही नव्हतं. खरं तर या भाषणात त्यांच्या नाकाखालून ४० आमदार निघून गेल्याचा संताप आणि निराशा होती. यावेळी केवळ हताशा पाहायला मिळाली. त्यामुळे त्यांच्या या हताश भाषणावर जास्त काही बोलणं मी योग्य समजत नाही”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा – “विदेशात नरेंद्र मोदींनी नेहरू, इंदिराजी, राजीव गांधी..”, ठाकरे गटाचा हल्लाबोल; विरोधकांच्या ‘त्या’ पत्राचा केला उल्लेख!

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

रविवारी खेड येथील सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपावर जोरदार टीका केली होती. “शिवसेना फोडणारे मराठी माणसाच्या आणि हिंदुंच्या एकजुटतेवर घाव घालत आहेत. हिंदुत्वासाठी शिवसेनाप्रमुखांनी संपूर्ण आयुष्य वेचलं. त्या हिंदुत्वाला धुमारे फुटत असताना शिवसेना फोडण्यात आली. यांना कोण विचारत होतं, भाजपाला गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं. तेव्हा शिवसेनाप्रमुख यांच्यामागे उभे राहिले नसते, तर हे आज दिसले नसते. मात्र, हे निष्ठुर आणि निर्घृणपणे वागत आहेत. ज्यांनी साथ दिली त्यांनाच संपवत आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. तसेच भाजपाने आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करून पाहावा, असं आव्हानही त्यांनी दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-03-2023 at 09:03 IST