Nirmala Sitharaman Maharashtra Budget Allocation : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत देशाचे बजेट सादर केले. यानंतर या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या पदरात काय पडले? याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या स्वप्नाकडे जाणारे एक दमदार पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. वाढत्या शहरीकरणाला नियोजनबद्ध करण्यासाठी पहिल्यांदाच ५ लाख पेक्षा जास्त लोकसंख्येच्या वरच्या शहरांचा एकात्मिक विचार या अर्थसंकल्पाने केला आहे. ज्याचा मोठा फायदा महाराष्ट्राला होईल, विशेषतः मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती हे या अर्थसंकल्पाचे ध्येय दिसत आहे असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फडणवीस पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये १२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केंद्र सरकार करणार आहे. १० वर्षांपूर्वी वर्षाला एक लाख कोटींची गुंतवणूक आपण करायचो, त्यावरून एकाच वर्षात १२ लाख कोटींची गुंतवणूक हा एक महत्त्वाचा मुद्दा पाहाता येईल. शेती, पशू पालन, मत्स्य व्यवसाय आणि सिंचन या ४ क्षेत्रांसाठी भरीव तरतूदी आणि योजना, तसेच यात गुंतवणूक होईल यासाठी एक चांगला प्लॅन या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सीतारमण यांनी घोषित केला आहे, असेही फडणवीस म्हणाले.
प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी हॉस्टेल ही योजना घोषित करण्यात आली आहे. आपली आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या रुग्णालयात कॅज्युअल्टी आणि ट्रॉमा सेंटर तयार करण्यात येणार आहे. ज्यामुळे ग्रामिण आणि गरीब लोकांसाठी व्यवस्था तयार होईल.
सर्व ग्रोथ हब्ससाठी ५ वर्षात प्रत्येकी ५ हजार कोटी देण्याचा एक कार्यक्रम आखण्यात आला आहे. याचा फायदा महाराष्ट्राला होईल, कारण आपण एमएमआर ग्रोथ हब, पुणे ग्रोथ हब आणि नागपूर ग्रोथ हब असे तीन ग्रोथ हब आपण नीती आयोगाच्या माध्यमातून तयार केले आहेत, असेही फडणवीस म्हणाले.
अनेक वर्षांपासून मागणी असलेला मुंबई-पुणे कॉरिडॉर याची घोषणा झाली आहे. पुणे हैद्राबाद हायस्पीड कॉरिडॉर होतोय, ज्याचा फायदा पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राला फायदा होईल, असे फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्राला अर्थसंकल्पाक काय मिळालं?
१) डिवोल्यूशन ऑफ टॅक्सेस (Devolution of Taxes)मध्ये जो फॉर्म्युला दिला त्यामध्ये महाराष्ट्राला फायदा झाला आहे. डिवोल्यूशनमध्ये आपण ६.४४ टक्क्यांवर गेलो असल्याने आपल्याला या वर्षी ९८ हजार ३०६ कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळतील. मागील वर्षीपेक्षा जास्त निधी यावर्षी मिळणार आहे.
२) ग्रामिण रस्ते प्रकल्प – ३७८ कोटी
३) अॅग्री बिझनेस नेटवर्क – १६७ कोटी
४) इकॉनॉमिक क्लस्टर – २८३ कोटी
५) महाराष्ट्र टर्शरी केअर मेडिकल एज्युकेसन विकास कार्यक्रम यासाठी ३८५ कोटी
६) उपसा सिंचन योजनांचे सौरउर्जिकरण २०७ कोटी
७) अॅग्री बिझनेस अँड रूरल ट्रान्सफॉर्मेशन ६४६ कोटी
८) डेव्हलपमेंट अँड अॅप्लाइड नॉलेज अँड स्कील फॉर ह्युमन डेव्हलपमेंट ३१३ कोटी
९) जिल्ह्यांमध्ये संस्थात्मक संरचना क्षमता वृद्धीसाठी २४० कोटी
१०) मुंबई अहमदाबाद हाय स्पीड कॉरिडॉर ६१०३ कोटी
११) मुंबई मेट्रो १७०२ कोटी
१२) पुणे मेट्रो ५१७ कोटी
१३) एमयूटीपी ३ मुंबईकरिता ४६२ कोटी
१४) एमएमआर रिजनमध्ये ग्रीन मोबिलीटी यासाठी १५५ कोटी
१५) महामार्गावर आयटीएस ६८० कोटी
एकीकडे महाराष्ट्राला डिवोल्यूशन ऑफ टॅक्सेसमधून १ लाख कोटी आणि वेगवेगळ्या योजनांवर देखील मोठ्या प्रमाणात निधी महाराष्ट्राला या अर्थसंकल्पात मिळाला आहे, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

