Devendra Fadnavis On K Annamalai : राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा मराठी आणि अमराठी मुद्दा गाजत आहे. मात्र, असं असतानाच भाजपाचे तमिळनाडूमधील नेते के.अण्णामलाई यांनी ‘मुंबई महाराष्ट्राचं शहर नाही’, असं वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. अण्णामलाई यांनी मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत ‘अण्णामलाई यांच्या वक्तव्याचा अर्थ मुंबई हे शहर महाराष्ट्राचं नाही असा नव्हता’, असं म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“अण्णामलाई हे आमचे तमिळनाडूचे नेते आहेत, ते तमिळ लोकांच्या आग्रहाखातर मुंबईत आले होते. आता नुकतंच कुठे ते हिंदी बोलायला लागले आहेत. आपण विचार करा, म्हणजे मी जेव्हा तमिळनाडूला सभा घ्यायला गेलो होतो, तेव्हा माझ्या तोंडूनही मद्रास असं निघालं होतं. त्यानंतर मला त्यांनी सांगितलं, मग मी त्यात सुधारणा केली आणि चेन्नई म्हटलं. मग मला त्यांचा अपमान करायचा होता का?”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
“आता अण्णामलाई यांच्या वक्तव्यावरून जे उड्या मारणारे लोक आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की, बॉम्बेचं मुंबई करणारे हे भाजपाचे राम नाईक आहेत, तुम्ही नाही. त्यासाठी तुमचं फक्त समर्थन होतं. पण त्यासाठीची सगळी लढाई लढून विधानसभा आणि लोकसभेचे सगळे कायदे करणारे हे राम नाईक आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे”, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
“अण्णामलाई यांचं म्हणणं असं होतं की, मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि ते खरं आहे. मग त्याचा अर्थ मुंबई हे शहर महाराष्ट्राचं नाही असा नव्हता. आता एखादा व्यक्ती, ज्याला हिंदी येत नाही. जो हिंदी बोलण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्यातून लगेच अण्णामलाई हे जणू काही पंतप्रधानच असल्यासारखं केलं”, असं देवेंद्र फडणवीस यांनी टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहिशी बोलताना म्हटलं आहे.
अण्णामलाई यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
भाजपाचे नेते के.अण्णामलाई प्रचारादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले की, “मुंबईच्या लोकांना ट्रिपल इंजिन सरकार हवं आहे. तुम्ही चेन्नई शहरात पाहिलं तर तिथे डीएमकेची सत्ता आहे आणि केंद्र भाजपा. बंगळुरू आणि हैदराबादमध्येही खाली काँग्रेस आणि वर भाजपा आहे. मुंबई असं एकमेव शहर आहे, जिथे ट्रिपल इंजिन सरकार शक्य आहे.”
‘बॉम्बे महाराष्ट्राचे शहर नाही’
के.अण्णामलाई म्हणाले होते की, “बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नाही. हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराच्या मनपाचं बजेट ७५ हजार कोटी आहे. चेन्नई ८ हजार आणि बंगळुरूचं बजेट १९ हजार कोटी आहे. त्यामुळे या शहराचं नियोजन करण्यासाठी चांगल्या लोकांची गरज आहे.”
शेवटी पोटातलं ओठांवर आलंच… भाजपाला आम्ही शेवटचं सांगतोय, निवडणुका गेल्या तेल लावत पण मुद्दामहून असल्या बांडगुळांना आणून मराठी माणसाला चिथावू नका… पुन्हा तुमचा कुणी भाजपावाला मुंबादेवीच्या मुंबईला बॉम्बे म्हणाला आणि बलिदान देऊन मिळवलेल्या मुंबईवरून मराठी माणसालाच हिणवलं तर… pic.twitter.com/EVp9SA8QhM
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) January 9, 2026
संजय राऊतांनी केली होती टीका
अण्णामलाई यांच्या वक्तव्यानंतर पत्रकार परिषद बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, “एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचे यावर काय म्हणणे आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात सूर्य-चंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे होऊ देणार नाही. गर्जना चांगली असली तरी तुमच्या पक्षाचेच पुढारी इथे येऊन मुंबई महाराष्ट्राची नाही, असे म्हणतात. यावर त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. मुंबई महाराष्ट्राची नाही, हे भाजपाचे स्टार प्रचारक सांगत आहेत. अण्णामलाई असं बोलत असतील तर त्यांच्याविरोधात राज्यात गुन्हा दाखल केला पाहिजे. महाराष्ट्राच्या राजधानीविषयी ते असं विधान कसं करू शकतात? १०६ हुतात्म्यांचा अवमान भाजपाच्या अण्णामलाई यांनी केला असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली पाहिजे. कुठे आहे तुमचे स्वाभिमानी बाणा?”, असं संजय राऊतांनी म्हटलं होतं.
