Devendra Fadnavis : राज्यात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. असं असतानाच भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांनी लातूरमधील एका कार्यक्रमात बोलताना विलासराव देशमुख यांच्याबाबत एक धक्कादायक वक्तव्य केलं होतं. ‘विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील’, असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी भाजपावर टिकेची झोड उठवली. त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली.

रवींद्र चव्हाण यांच्या या वक्तव्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘विलासराव देशमुख यांच्या आठवणी कोणीही पुसू शकणार नाही. विलासराव देशमुख यांच्याबाबत सर्वांनाच आदर आहे’, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे, दिलगिरी देखील व्यक्त केली. रवींद्र चव्हाण यांनी हे स्पष्टपणे सांगितलं की मी फक्त रेकॉर्डबाबत बोलत होतो. बाकी विलासराव देशमुख यांच्याबाबत या महाराष्ट्रात सर्वांना आदर आहे. त्यामुळे विलासराव देशमुख यांच्या स्मृती कोणीही पुसू शकणार नाही आणि कोणी पुसू शकत नाही. त्यांच्याबाबत आम्हाला सर्वांना आदर आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“आम्ही जरी काँग्रेसच्या विरोधात लढत असलो तरी देखील विलासराव देशमुख यांच्या संदर्भात आणि महाराष्ट्रातील जे प्रमुख नेते आहेत, ज्यांनी महाराष्ट्रात उत्तम काम केलं, त्यापैकी एक विलासराव देशमुख आहेत. हे स्पष्टीकरण चव्हाणांनी देखील दिलं. निवडणुकीच्या काळात कोणीही दिलगिरी व्यक्त करत नाही, पण चव्हाणांनी दिलगिरी व्यक्त केली. कारण त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघाला होता”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

रवींद्र चव्हाणांनी व्यक्त केली दिलगिरी

आज (६ जानेवारी) ते छत्रपती संभाजीनगर येथे प्रचाराला गेले असताना माध्यमांनी त्यांना त्यांच्या वक्तव्याविषयी विचारलं. त्यावर ते म्हणाले, नागरी सुविधा कोणता पक्ष अतिशय गतिमान पद्धतीने करून देईल, याकरता महापालिकांच्या निवडणुका होत असतात. लातूरमध्येही गतिमान पद्धतीने सर्व नागरी सुविधा व्हायला हव्यात. मी विलासरावांविरोधात टीका टिप्पणी केलेली नाही. विलासराव देशमुखांच्या नावेच काँग्रेस आजही मते मागत आहे. आम्ही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केलेलं काम आणि महायुतीने विकासात्मक दृष्टीने केलेल्या कामासाठी मतदान मागत आहोत. पण तरीही, माझ्या वक्तव्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो,” असंही ते म्हणाले.

रवींद्र चव्हाणांनी काय वक्तव्य केलं होतं?

लातूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाच्या वतीने बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत भाषण करत असताना रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं. “सर्वांनी दोन्ही हात ऊंच करून घोषणा द्यायची आहे, भारत माता की जय, वंदे मातरम्, वंदे मातरम्, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, खरंतर आपल्या सर्वांचा उत्साह पाहिला तर लक्षात येतंय की, १०० टक्के विलासरावांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील, यात काही शंका नाही” असं वक्तव्य चव्हाण यांनी केलं होतं.