Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंविरोधात खोटी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर दबाव आणला, असा आरोप काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांनी केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांच्या कलगीतुरा रंगला आहे. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.

दरम्यान, आज अनिल देशमुख यांनी चांदीवाल आयोगाच्या अहवालाची प्रत दाखवत पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. खुनाच्या गुन्हातील अरोपीच्या कुबड्यावर देवेंद्र फडणवीस यांना माझ्यावर आरोप करण्याची वेळ आली, अशी टीका त्यांनी केली. तसेच महायुती सरकार हा अहवाल प्रसिद्ध करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. या आरोपालाच देवेंद्र फडणवीस यांनीदेखील प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा – Sachin Waze On Anil Deshmukh : सचिन वाझेंचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांच्या पीएमार्फत…”

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

चांदीवाल आयोगाचा अहवाल महाविकास आघाडीच्या काळात आला होता. मग तो अहवाल प्रसिद्ध का गेला नाही? याचं उत्तर आधी त्यांनी द्यावं. मुळात परवमीर सिंह यांना महाविकास आघाडीने आयुक्त केलं होतं. अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांनी आरोप केले होते. खरं तर विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून एखादा पोलीस आयुक्त गृहमंत्र्यांवर आरोप कसे करेल? त्यामुळे या सगळ्या कपोलकल्पित गोष्टी आहेत. यात काहीही अर्थ नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना, अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करण्यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या सांगण्यावरूनच हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतर करण्यात आलं होतं. यात केंद्र सरकारचा काहीही संबंध नव्हता. त्यावेळी न्यायालयाने जे आदेश दिले, ते बघितले तर या सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच रोज अशाप्रकारे कुणी येऊन बोलत असेल तर त्यांच्या स्तरावर जाऊन या प्रकरणावर बोलायची माझी इच्छा नाही. पण शेवटी सत्य सर्वांना माहिती आहे. सत्य जनतेसमोर आलं आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – “देवेंद्र फडणवीसांमध्ये दम असेल तर…”, नाना पटोले यांचं खुलं आव्हान

अनिल देशमुख नेमकं काय म्हणाले होते?

अनिल देशमुख यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेत पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं होतं. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंह व सचिन वाझे यांनी माझ्यावर केलेल्या आरोपावर न्यायमूर्ती चांदीवाल यांनी ११ महीने चौकशी केली. या चौकशी दरम्यान सचिन वाझे यांनी उलट चौकशीत कोर्टामध्ये स्पष्टपणे सांगितले होते की, अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही पी.ए.ने मला पैसे मागितले नाही आणि मी त्यांना कधी पैसे दिले नाही. आता तोच आरोप करत आहे, खुनाच्या गुन्हातील अरोपीच्या कुबड्यावर राजकीय सुडबुध्दीने देवेंद्र फडणवीस यांना माझ्यावर आरोप करण्याची वेळ आली, अशी टीका त्यांनी केली होती.

याशिवाय न्यायमूर्ती चांदीवाल यांनी माझ्यावरील आरोपाच्या चौकशीचा १४०० पानांचा अहवाल हा राज्य सरकारकडे २ वर्षांपूर्वी सादर केला आहे. परंतु दोन वर्षांपासून तो अहवाल राज्य सरकार लोकांसमोर आणत नाही. यासाठी मी अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून न्यायमूर्ती चांदीवाल यांचा अहवाल सार्वजनिक करण्यासाठी विनंती केली आहे, असा आरोपही त्यांनी केला होता.