अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय हे फडणवीसांचं विधान राज्यभर चांगलंच गाजत आहे. अनेक नेत्यांनी या विधानावर प्रतिक्रिया देत त्याची खिल्ली उडवली आहे, तर अनेकांनी फडणवीसांवर शेलक्या शब्दात टीकाही केली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही मी चार वर्ष मी मुख्यमंत्री होतो पण माझ्या लक्षात कधी राहिलंही नाही. ही आमची कमतरता आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीसांच्या वक्तव्यासंदर्भात दिली आहे. आता त्यालाच उत्तर देत देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केला आहे.

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, फरक हा आहे की मी सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलो. चाळीस वर्षांनंतर मी सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलो. पवार साहेब मोठे नेते आहेत. पण ते कधीच सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले नाहीत. राहिले असते तर बरं झालं असतं. त्यांनी चांगलंच काम केलं असतं. पण त्यावेळच्या परिस्थितीमुळे त्यांना कधी अडीच वर्षे, कधी दीड वर्षे असं मुख्यमंत्रिपदावर राहावं लागलं. पण एका गोष्टीचं मला समाधान आहे की, मी विरोधी पक्षनेता म्हणूनही समाधानी आहे हे पाहून आख्खी महाविकास आघाडी अस्वस्थ झाली आहे. हीच माझ्या कामाची पावती आहे.

आणखी वाचा – “अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय” म्हणणाऱ्या फडणवीसांना शरद पवारांचा चिमटा; म्हणाले…

आज मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकारपरिषदेत बोलताना पवार यांनी फडणवीसांना चांगलाच टोला लगावला आहे. ते म्हणाले, “पाच वर्ष सत्तेत असल्याचं स्मरण राहणं हे कधीही चांगलं. वेदना किती खोल आहे हे यातून दिसतं, पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर आपण सत्तेत आहोत याचं स्मरण ठेवणं ही चांगली गोष्ट आहे. मी चार वर्ष मी मुख्यमंत्री होतो पण माझ्या लक्षात कधी राहिलंही नाही. ही आमची कमतरता आहे हे मी कबूल करतो. सत्ता गेल्याची वेदना किती सखोल आहे हे यातून दिसून येतं”. सत्ता येते जाते याचा फारसा विचार करायचा नसतो, असा सल्लाही पवार यांनी फडणवीसांना दिला.