राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनात विविध विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. आज (१० जुलै) अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला विधानसभेत उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना हिंदीतून ‘भाडे के टट्टू’ अशा शब्दांत हल्लाबोल केला होता. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली होती. तसेच एका मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची मिमिक्री केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरेंच्या टीकेला अतिशय तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

‘राज ठाकरे जर मिमिक्रीच्या क्षेत्रात असते, तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला मार्केट राहिलं नसतं’, अशा खोचक शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

“विधानसभेत मी परवा भाषण केल्यानंतर अनेक लोकांना मिरच्या लागल्या आहेत. खरं म्हणजे मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं होतं की, मिसिंग लिंकवरील जो काही पूल आहे, त्या ठिकाणी जगातील सर्वात मोठे टनेल्स आहेत. याला एकही क्रक्स गेलेले नसताना, कोणतंही नुकसान झालेलं नसताना देखील ७ हजार कोटी पाण्यात गेले अशी टीका करण्यात आली. मग हा माझा अपमान आहे का? हा महाराष्ट्राचाच अपमान आहे. खोट्या बातम्या पेरणं किंवा खोट्या बातम्या पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे”, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

‘भाडे के टट्टू’ या शब्दाबाबत फडणवीस काय म्हणाले?

“मी परवा विधानसभेत बोलता-बोलता हिंदीत बोललो की ‘भाडे के टट्टू’, तर मला काहीजण म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृत बोलायला पाहिजे होतं. त्यामुळे मी थोडा अभ्यास केला. आता मी माझं ‘भाडे के टट्टू’ हे शब्द परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे ‘भाटक गर्दभ’ म्हणतो. आता ‘भाडे के टट्टू’ नाही, तर ‘भाटक गर्दभ’. तरीही कोणाला समजलं नसेल तर मग सुपारीबाज म्हणतो. मात्र, मी तर काही सुपारीबाजांबाबत बोललो होतो. मी फक्त टोपी फेकली होती, तरी देखील अनेकांना ती टोपी लागली”, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

“मी एक वाक्य हिंदीत बोललो. मी ते वाक्य ज्यांना समजायला पाहिजे होतं म्हणून बोललो होतो, तर दुसऱ्यालाच मिरची लागली आणि मग आमचे मिमिक्री आर्टीस्ट मला म्हणायला लागले की तुम्ही हिंदीत का बोलले? खरं तर संपूर्ण भाषण मी मराठीत केलं होतं. पण तरीही मला काहीही अडचण नाही. ते (राज ठाकरे) माझे मित्रच आहेत. ते मित्र असल्यामुळे राजकारणात तर त्यांच्यापासून आम्हाला काही धोका नाही. पण ते राजकारणात आहेत आनंद आहे. मात्र, जर ते मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते, तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला मार्केट राहिलं नसतं”, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

राज ठाकरेंनी फडणवीसांवर काय टीका केली होती?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिसिंग लिंकवर केलेल्या टीकेवर विधानसभेत उत्तर दिलं होतं. यावरून राजकारण करणाऱ्यांना जाब विचारत त्यांनी कारवाईचा इशारा दिला. यावेळी ते सभागृहात हिंदीतून बोलले होते. यावरून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती.

“मुख्यमंत्री आहेस ना तू? वाक्य संपल्या संपल्या हिंदीतून सुरू झाले. मिसिंग लिंक के बारे… कोणासाठी हिंदी बोललात? समोरचे आमदार मराठी, महाराष्ट्राची विधानसभा. महाराष्ट्राच्या विधानसभेत मुख्यमंत्री हिंदीत बोलतात? कोणासाठी? कदाचित आपल्याच पक्षातील वरच्या लोकांना सांगायचं असेल. बघून घेईन”, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली होती.

मुख्यमंत्र्यांची केली होती मिमिक्री

फडणवीसांची मिमिक्री करत राज ठाकरे म्हणाले होते की, “एकवेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान करू नका. लोक मिसिंग लिंकवर बोलत आहेत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करत आहेत? केंद्राच्या कोणत्या गोष्टीवर बोललात की तुम्ही देशविरोधी. केंद्राची कामे आहेत ही, त्यात देशाचा संबंध काय? मिसिंग लिंकवर बोलल्यावर महाराष्ट्राचा अपमान कसा झाला? लोकांनी प्रश्नही विचारू नये? काय चाललंय हे? जे काही घमासान सुरू आहे पक्षात, ते फक्त पाहात राहा. शहरांचा विचका झाला आहे. ज्याला हे विकास म्हणत आहेत. या विषयावर मी इतके वर्ष बोलतोय. आपल्याकडे टाऊन प्लानिंग होत नाही. बघावं तिकडे इमारती उभ्या राहत आहेत. माझी विनंती सर्व बांधकामे बंद करा, ब्रीज आणि फ्लायओव्हर म्हणजे विकास नाही”, असं म्हणत राज ठाकरे यांनी फडणवीसांची मिमिक्री केली होती.