मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एका पत्रकार परिषदेत बोलताना नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची बहुतांश कामे गुजरातच्या कंत्राटदारांना दिल्याचा आरोप केला होता. महाराष्ट्रात कंत्राटदार जन्मालाच आले नाहीत का? असा सवालही राज ठाकरे यांनी सरकारला केला होता. राज ठाकरे यांच्या या टीकेनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत प्रत्युत्तर दिलं आहे.
‘गुजरातच्या कंत्राटदारांना कामं दिले वैगेरे हे सर्व खोटं आहे. आपण कुंभमेळ्याच्या कामांची कंत्राटं हे स्पर्धात्मक पद्धतीने दिलेले आहेत, बिड कॅपॅसिटी आणि पात्रता पाहूनच कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत’, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचे सर्व कामे गुजरातच्या कंत्राटदारांना दिल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न विचारला. यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “गिरीश महाजन यांनी या संदर्भात सांगितलं आहे. मात्र, तरीही मी पुन्हा सांगतो की, गुजरातच्या कंत्राटदारांना कामे दिले वैगेरे हे सगळं खोटं आहे. मात्र, काही असूही शकतात. आपल्या देशामध्ये आणि कोणत्याही राज्यात कोणत्याही कामांचं कंत्राट देताना त्या व्यक्तीची जात पाहता येत नाही, त्याचा धर्म पाहता येत नाही, त्याची भाषा पाहता येत नाही. त्या कंत्राटदारांची बिड कॅपॅसिटी आणि पात्रता पाहूनच कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“कंत्राट देताना कंपनी पाहायची असते, कंपनीच्या मागे कोण आहे हे पाहिलं जात नाही. मला या गोष्टींचं समाधान आहे की, जे काही या ठिकाणी टेंडर दिले गेलेले आहेत, ते अतिशय स्पर्धात्मक पद्धतीने दिले गेलेले आहेत. त्यावर तीन प्रकारच्या गुणवत्ता तपासण्या लावण्यात आलेल्या आहेत. तसेच कामांची गुणवत्ता तपासणी झाल्यानंतरच सर्व पैसे त्यांना दिले जाणार आहेत. मात्र, तरीही जर कोणाला या कंपन्यांच्या मागे असलेल्या मराठी माणसांची नावंही हवी असतील, तर आपण ती नावं त्यांना पाठवून देऊ. पण हे खरं आहे की आपल्याकडे ज्याची बिड कॅपॅसिटी असते, त्यांनाच कंत्राट दिले जातात”, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.
