“…मग राणे, राज ठाकरे पक्ष सोडून का गेले?”, उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचा खोचक सवाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

Uddhav Devendra
संग्रहीत छायाचित्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर मुख्यमंत्रिपदावरुन खोचक टीका केली होती. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायची महत्त्वकांक्षा नव्हती तर नारायण राणे आणि राज ठाकरे शिवसेना सोडून का गेली? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे. मुख्यमंत्रिपदाची त्यांची महत्त्वकांक्षा होती, ती त्यांनी पूर्ण केली. आता त्याला तत्वज्ञानाची जोड देत आहेत. ते त्यांनी थांबवावं. शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्दच पाळायचा होता तर सुभाष देसाई, दिवाकर रावते, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं होतं. मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं? राणेंना तर पक्षप्रमुख व्हायचं नव्हतं. राज ठाकरेंना पक्षातून का जावं लागलं? त्यामुळे दोष देणं थांबवा. आता दोन वर्ष झाले आहेत. किती दिवस तेच तेच बोलणार. राजकारणात महत्त्वकांक्षा असणं गैर नाही. पण त्याला तत्वज्ञानाची जोड देणं कितपत योग्य आहे?”

हेही वाचा – बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलण्याचे उद्धव ठाकरेंचे मनसुबे – देवेंद्र फडणवीस

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “तुम्ही ज्या आविर्भावात सांगताय की जनतेने भाजपाला नाकारलं. तर नव्हे, जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारलं आणि तुम्हाला वरपास केलं. त्यामुळे हे बेईमानीने तयार झालेलं सरकार आहे. मुख्यमंत्री म्हणाले की आम्हाला महाराष्ट्राचा बंगाल करायचाय, म्हणजे नक्की काय करायचंय? खंडणीबाजीमुळे बंगालमध्ये एकही उद्योग टिकलेला नाही. तुमच्या विरोधात जो बोलेल त्याचे हात पाय तोडून त्याला फासावर लटकवायचा असा महाराष्ट्र घडवायचा आहे का? आमच्यात जोवर रक्ताचा एक थेंब आहे तोवर आम्ही, महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. महाराष्ट्र महाराष्ट्रच राहील”.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Devendra fadnavis reply to cm uddhav thackeray over his speech vsk

ताज्या बातम्या