CM Devendra Fadnavis clarifies stance on Marathi language row: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी सक्तीच्या मुद्द्याची चर्चा होताना दिसत आहे. अमराठी रिक्षाचालकांना मराठी शिकवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यानुसार त्यांना टप्प्याटप्प्याने मराठी भाषा शिकवण्याचं नियोजनदेखील करण्यात आलं आहे. याला रिक्षाचालक संघटनांकडून विरोध करण्यात आल्यानंतर ही मुदत ऑगस्ट महिन्यापर्यंत वाढवण्यात आली आहे. मराठी बोलणार नाही, असं म्हणायची कुणाची हिंमत कशी होते? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केल्यानंतर त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुंबईतील हुतात्मा चौकात आदरांजली वाहिल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली.

राज ठाकरेंचं नेमकं म्हणणं काय?

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात एका व्याख्यानमालेत केलेल्या भाषणादरम्यान राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली. “आज महाराष्ट्रात रिक्षाचालकांनी मराठी बोलण्याचा मुद्दा आलाय. मराठी बोलणार नाही हे सांगायची हिंमत कशी होते? त्यावर आमचे मंत्री त्यांना सांगतायत ठीक आहे, चार महिने आणखी घ्या पण मराठी शिका. हिंमत नाही तुमची? त्यांचे परवाने रद्द करा ना. वाद कसा पेटवायचा तेवढं फक्त बघा. सध्याच्या कोणत्याही स्थितीत तुम्हाला राजकारण सोडून बोलता येत नाही. राजकारण येतंच त्यात. पण हे सगळं वाट्टोळं महाराष्ट्रातल्या राजकारण्यांमुळे झालं आहे”, असं राज ठाकरे या कार्यक्रमात म्हणाले.

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विचारणा केली असता त्यांनी त्यावर टीकात्मक उत्तर दिलं. “एक तर महाराष्ट्र इतका संकुचित कधीच नव्हता की महाराष्ट्रात परप्रांतीयांनी राहू नये किंवा अमुकच लोकांनी इथे राहावं अशी संकुचित वृत्ती महाराष्ट्रानं कधीच पाळली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो महाराष्ट्र धर्म आपल्याला शिकवला, त्या धर्मालाही ते अपेक्षित नाही. मला तर आनंद आहे की माझा मराठी बांधव मी देशाच्या कुठल्याही राज्यात गेलो, तरी तिथला महत्त्वाचा नागरिक म्हणून त्या त्या संस्कृतीत, राज्याच्या विकासात भर टाकताना दिसतोय”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भाषेच्या मुद्द्यावरून कुणाला मारणं मान्य नाही – देवेंद्र फडणवीस

“भाषेबाबत बोलायचं तर स्वभाषेचा, मराठी भाषेचा अभिमान असलाच पाहिजे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकानं मराठी भाषा शिकलीच पाहिजे. मला नक्कीच असं वाटतं की जे लोक महाराष्ट्रात वास्तव्यास आहेत, ते मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतील. जे शिकले नाहीत, त्यांना शिकवण्याचा प्रयत्न आम्ही करू. पण भाषेच्या आधारावर हिंसा, भाषेवर विवाद, भाषा येत नाही म्हणून कुणाला मारणं हे आम्हाला मान्य नाही. यातला मार्ग हा आहे की आपली भाषा इतकी सुंदर आणि सोपी आहे की कुणालाही शिकवता येते. त्यामुळे या सर्व लोकांना मराठी भाषा शिकवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत”, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाषेच्या मुद्द्यावरून ‘खळ्ळखट्याक्’ करणाऱ्या मनसेला उत्तर दिलं आहे.

महाराष्ट्रदिनी जगभरातील मराठी जनांन दिल्या शुभेच्छा

यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जगभरातील मराठी बांधवांना शुभेच्छा दिल्या. “जगभरातील मराठी माणसांना मी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो. महाराष्ट्र देशाला सातत्याने दिशा देत आहे. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा हे आपण महाराष्ट्र गीतात म्हणतो. हे शेकडो वर्षांपासून महाराष्ट्रानं दाखवून दिलं आहे. महाराष्ट्र दिन आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा दिवस आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

तसेच यावेळी त्यांनी कामगार दिनाच्यादेखील शुभेच्छा दिल्या. “आज कामगार दिवसदेखील आहे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंनी सांगितलं होतं की पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर नाही तर कामगारांच्या तळहातावर असते. ज्या कामगारांनी ही संपूर्ण व्यवस्था निर्माण केली, भारतात, जगात, महाराष्ट्रात आपल्या श्रमानं आपल्यासाठी एवढी मोठी संपत्ती निर्माण केली, त्या कामगारांना मी शुभेच्छा देतो. जगभरातल्या कामगारांनादेखील कामगार दिनाच्या शुभेच्छा”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या.