ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही हे ऑपरेशन देवेंद्र आहे. देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान होण्यात एकनाथ शिंदे अडसर ठरू शकतात म्हणून निवडणूक नसताना फोडाफोडी झाली असं खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली नव्हती आता मात्र देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं आहे. आपल्या खुमासदार शैलीत देवेंद्र फडणवीस यांनी एक हिंदी गाणं सांगत आमचा प्रेमभंग झाला आहे असंही म्हटलं आहे.

ऑपरेशन टायगर बाबत देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आहे?

मित्र पक्षाने सहा खासदारांचं ऑपरेशन जे काही ते केलं, बाकी अशा प्रकारच्या गोष्टी जेव्हा राजकारणात घडतात तेव्हा त्याचे तपशील जाहीर करायचे नसतात. मित्र पक्षाला आमचा योग्य तो पाठिंबा होता, त्यांना जी आवश्यकता पडली तेवढी मदत आम्ही त्यांना केली आहे. याशिवाय सगळे तपशील सांगणं हे सूज्ञ राजकारणाचं लक्षण नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राजकारणात प्रत्येकजण भविष्य, भवितव्य पाहात असतो-फडणवीस

राजकारणात प्रत्येकजण भविष्य, भवितव्य पाहात असतो, ज्या नेतृत्वात मी काम करतोय ते नेतृ्त्व माझं भविष्य सुरक्षित ठेवू शकत नाही हे जेव्हा वाटू लागतं, तेव्हा जिथे भविष्य दिसतं तिथे लोक जातात. अडीच वर्षे आम्ही जेव्हा विरोधात होतो तेव्हा एकही माणूस फुटला नाही. कारण अडीच वर्षे आम्ही आमच्या लोकांना घेऊन भांडत राहिलो. आम्हाला त्रास देण्याा प्रयत्न केला तेव्हा आम्ही घाबरलो नाही. आम्ही एकही दिवस सरकारला झोपू दिलं नाही, त्यामुळे सोबतच्या लोकांना हा विश्वास होता की हा ज्या नेत्यासह आपण काम करतोय तो उद्या का होईना सत्तेपर्यंत नेऊ शकतो. आम्ही जेव्हा १५ वर्षे विरोधी पक्षात होतो तेव्हा आमचे नेते मुंडे साहेब होते. त्यांच्यामुळे आम्हाला हे वाटायचं की आपल्याजवळ हा नेता आहे. कुठल्याही पक्षात नेत्याने आत्मविश्वास वाढवला पाहिजे ते दिसत नाही तेव्हा मग पक्ष संपतात असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई तक बैठक या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिलं आहे.

आमचा मित्र पक्ष ऑपरेशन करतोय तर मी का थांबवू?

उद्धव ठाकरे जे काही बोलले ते मी ऐकलं त्याने माझंही मनोरंजन झालं. समजा माझा मित्र पक्ष एक ऑपरेशन करतोय? तर मी ते का थांबवावं. शिवाय असं काय प्रेम आमच्यात उरलं आहे की जे दिवसरात्र माझ्या बरोबर आहेत त्यांना थांबवून ज्यांनी माझी योग्य वेळी साथ सोडली त्यांच्या मदतीला जाण्याचं कारण काय? काहीच कारण नाही. राजकीय अस्तित्वाचा विषय हा त्यांच्यासाठी आहे माझ्यासाठी नाही. माझ्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्नच नाही ते कसं टिकवायचं आहे ते मला माहित आहे. एक राजकीय वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे की ज्या राज्यात बहुमतासाठी १४७ जागा लागतात त्या राज्यात ज्या पक्षाकडे १३७ आमदार आहेत त्या पक्षाचा मुख्यमंत्री राहिल की दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल? त्यामुळे कितीही कहाण्या, स्टोऱ्या तयार झाल्या तरीही वास्तव काय ते मला माहीत आहे, एकनाथ शिंदेंना माहीत आहे. आमच्यात योग्य संवाद आहे. अशा बातम्या छापून आल्याने आमच्या नात्यात काही फरक पडत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मला हे सगळं प्रेम २०१९ ला हवं होतं-फडणवीस

उद्धव ठाकरे म्हणतात मराठी पंतप्रधान व्हावेत त्यात शिंदे अडसर ठरत आहेत. याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की हिंदीत एक गाणं आहे बघा माना के तेरे जहां मे ये नहीं के प्यार नहीं मिलता, वो जब चाहिये तब नहीं मिलता. हे सगळं प्रेम मला २०१९ ला हवं होतं. तेव्हा प्रेमभंग झाला आहे, आता प्रेम जुळणं कठीण आहे. प्रेमभंगानंतर आम्ही दुसरं लग्न केलं, संसार थाटला, लग्नाचे वाढदिवस झाले आता काय राहिलं? असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे आणि उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं आहे. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जो पक्ष आहे तो पक्ष आता कन्सॉलिडेट होतो आहे. जे लोक तिकडे उरले होते त्यांनाही असं वाटू लागलं आहे की राजकारण करायचं असेल बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिवसेनेची शिवसेना.