आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नशामुक्त भारताचा संकल्प केला आहे. नशामुक्त भारत करण्यासाठी आपल्याला नशामुक्त मुंबई, महाराष्ट्र करणं गरजेचं आहे. आज आपला देश इतक्या वेगाने विकास करतो आहोत की आपण जगातली सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था झालो आहोत. भारत विविध आघाड्यांवर प्रगती करतो आहे. संरक्षण क्षेत्रात भारताने केलेली प्रगती ही जगाला थक्क करते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
भारताची ताकद जगाला दिसते आहे त्यामुळेच षडयंत्र-फडणवीस
भारताची ताकद जगाला दिसते आहे. भारतासमोर युद्ध पुकारता येत नाही त्यामुळे नवीन पद्धत सुरु झाली ती म्हणजे भारताला आतून पोकळ करायचं. ज्या तरुणाईच्या भरवशावर भारत महाशक्ती म्हणून पुढे येणार आहे. तरुणाईलाच नशेत आणलं गेलं तर उद्याचा भारत कमकुवत होईल असं छुपं युद्ध भारताच्या विरुद्ध सुरु झालं आहे. या छुप्या युद्धाचं सर्वात मोठं शस्त्र ड्रग्ज आहे. हळूहळू युवकांना व्यसनाधीन करत भारताला पोकळ करायचं आणि नेस्तनाबूत करायचं असं षडयंत्र सुरु आहे. त्या षडयंत्रात पैसे कमवण्यासाठी आपल्या देशातील काही शक्ती सामील झाल्या आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ड्रग्ज फ्री मुंबई या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यवेळी त्यांनी हे वक्तव्य कलं आहे.
आपल्याला निग्रह करुन लढा द्यावा लागेल-फडणवीस
एकीकडे ड्रग्जचं वाटप रोखण्यासाठी पोलीस काम करतीलच. पण विद्यार्थ्यांनी, युवकांनी ठरवलं की आम्हाला ड्रग्जच्या आहारी जायचं नाही तर ड्रग्जचं वाटप करण्याची कुणाची हिंमत होणार नाही. पोलीस आपलं काम करत आहेत. तसंच कॉलेज आणि शाळांच्या बाजूला अशी काही विक्री होत नाही ना याकडे लक्ष दिलं जातं आहे. एखाद्या विभागाने काही गोष्टी साध्य होणार नाही. आपल्याला प्रत्येकाला सामूहिक युद्ध पुकारावं लागेल. ज्या युद्धात ड्रग्ज संदर्भातली इको सिस्टिम उधळून टाकावी लागेल. विद्यार्थी, पालक, शिक्षक सगळ्यांनाच एकत्र येऊन काम करावं लागेल. जिथून ड्रग्ज येतात, तयार होतात अशा सगळ्या ठिकाणी कारवाईही केली जाईल. शाळा, कॉलेजच्या बाजूला जे ड्रग्ज विक्री करतात त्यांना जेरबंद करुन त्यांच्या आकांपर्यंत पोहचणं अशा पद्धतीने आपण काम केलं तर ड्रग फ्री मुंबई आणि महाराष्ट्र तयार होईल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुख्याध्यापकांना मुख्यमंत्र्यांनी केलं महत्त्वाचं आवाहन
आपल्या देशाची युवापिढी ही भारताचं संचलन करणार आहे. तुम्हीच वैज्ञानिक होणार आहात, डॉक्टर होणार आहात, वकील होणार आहात. त्यामुळे तुमचा निग्रह आवश्यक आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला युवा, तरुण आपल्याला तयार करायचा आहे. त्यासाठी जाण्याचा मार्ग ड्रग फ्री मुंबई, ड्रग फ्री महाराष्ट्र हा मार्ग आहे. मी स्वतः सगळ्या मुख्याध्यापकांना पत्र लिहितो आहे. कुणी व्यसनाधिनतेकडे जातं आहे हे कळलं तर आपण त्यावर उपाय करु. शिवाय ड्रग्ज पुरवठा करणाऱ्यांना जेरबंद करु. शिवाय माहिती देणाऱ्यांचं नाव कधीही बाहेर येणार नाही असंही आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
