मुंबईसह २९ महापालिकांची निवडणूक १५ जानेवारीला पार पडते आहे. १६ जानेवारीला निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणनवीस यांनी ANI ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. तसंच भाजपा क्रमांक १ चा पक्ष असेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हिंदुत्व हा आमचा आत्मा आहे-फडणवीस

हिंदुत्व हा आमचा आत्मा आहे, आम्ही मत मागत असताना हिंदुत्वावर मागत नाही. हिंदुत्व हे आमच्या विचारांतून आणि कृतीतून आहे. आमचं हिंदुत्व हे कधीही संकुचित नाही. आमचं हिंदुत्व पूजा पद्धतीवर आधारित नाही. आमचं हिंदुत्व हे देशाची जी प्राचीन संस्कृती आहे आणि जीवनपद्धती आहे याला आपला मानणारा जो माणूस आहे तो आमच्यासाठी हिंदू आहे.

हिजाबवाली महापौर बसवू अशा वल्गना-फडणवीस

मराठी आणि मु्स्लिम युती करुन आम्ही निवडून येऊ. हिजाबवाली महापौर बसवू अशा पद्धतीच्या वल्गना केल्या जातात आणि जाणीवपूर्वक मराठी आणि हिंदू यांच्यात भेद निर्माण करण्याचा प्रय़त्न केला जातो त्यावेळी हे सांगावं लागतं की मराठी आणि हिंदू हे काही वेगळे नाहीत. हिंदुत्वाशी तडजोड होऊ शकत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मशिदींवरचे लाऊड स्पीकर्स काढू असा प्रचार उद्धव ठाकरेंनी केलाय, रिअॅक्शन..

मशिदींवरचे लाऊड स्पीकर्स काढले पाहिजेत हे बाळासाहेब ठाकरेंना हवं होतं, त्यांनी ती मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयानेही यासंबंधी निर्णय दिला होता. मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सामंजस्याने, कुठलीही जोर जबरदस्ती न करता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय समजावून सांगत लाऊड स्पीकर्स काढले होते. आता ते पुन्हा लावण्याचं वचन दिलं जात असेल तर उद्धव ठाकरेंनी त्याचं उत्तर द्यायला पाहिजे. कुणाचंही सरकार आलं आणि कुणीही महापौर झाला तरीही लाऊड स्पीकरची संमती मिळणार नाही. यातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा खरा चेहरा दिसतो. त्यांचा हा प्रचाराचा मुद्दा आहे की आम्हाला निवडून द्या आम्ही लाऊड स्पीकर्स परत लावून देतो. यापेक्षा मोठं लांगुलचालन काय? सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची, संविधानाची पायमल्ली करुन जर ते कुणाचे तळवे चाटत असतील तर त्याची रिअॅक्शन दिसेलच. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ठाकरे बंधू माझ्यामुळे एकत्र आले असतील गर्वाची गोष्ट-फडणवीस

माझ्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले असतील तर ती माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. कारण बाळासाहेब ठाकरे यांना ही गोष्ट हवी होती. मी केलं असेल तर बाळासाहेब ठाकरेंचे मला आशीर्वादच मिळतील. पण मी आधीही सांगितलं होतं की हा प्रीतीसंगम नाही हा भीतीसंगम आहे. दोन्ही भावांसाठी त्यांच्या पक्षांसाठी अस्तित्त्वाची लढाई आहे त्यामुळे ते एकत्र आले आहेत असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.